esakal | ‘कोवीन’ ॲपवर नोंदणी असेल तरच लसीकरण; आता ज्येष्ठांचे लसीकरण बंद
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination

‘कोवीन’ ॲपवर नोंदणी असेल तरच लसीकरण; आता ज्येष्ठांचे लसीकरण बंद

sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : शहरात १८ ते ४४ वर्षादरम्यानच्या नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र अनेकांनी नोंदणी केल्याने तब्बल १५ मेपर्यंत स्लॉट मिळणार नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, कोवीन ॲपची साईटच हँग झाली आहे. यामुळे नागरिकांना नोंदणी करण्यातही अडचणी येत आहेत. दरम्यान ४५ वर्षांवरील ज्येष्ठांसाठीचे लसीकरण केंद्रे लशी संपल्याने बंद करण्यात आले आहे.

जिल्ह्यात लशींच्या तुटवड्यामुळे १३३ केंद्रांऐवजी खासगी २७ लसीकरण केंद्रही बंद करण्यात आली आहेत. यामुळे केवळ शासकीय १०६ केंद्रांवरच लसीकरण सुरू आहे. खासगी लसीकरण केंद्रांना लसींचा पुरवठा आता शासनाने बंद केला असून, तो खासगी रुग्णालयांनी त्यांच्या स्तरावर उपलब्ध करावयाचा आहे. जिल्हा प्रशासनाला मिळणाऱ्या लसी आता केवळ शासकीय केंद्रावरच जातील. खासगी केंद्रांवर जाणार नाहीत. ज्येष्ठांसाठीच्या कोव्हिशील्ड, कोवॅक्सिन लसी आता संपल्या आहेत. १८ ते ४४ वयोगटांसाठी ७,५०० लसी उपलब्ध असून, त्याही लवकरच संपतील. जेव्हा जस जशा नवीन लसी येतील तस तसे लसीकरण होणार आहे.

ज्‍येष्‍ठांना जावे लागले परत

आज शहरातील रेडक्रॉस सोसायटी, पोलिस मल्टिपर्पज हॉल, रोटरी भवन, महापालिकेच्या रुग्णालयातील ज्येष्ठांचे लसीकरण केंद्र हेाते. तर १८ ते ४४ वयोगटांसाठीच लसीकरण सुरू होते. ज्यांनी कोवीन ॲपवर नोंदणी केली आहे व त्यांना लसीकरणाची तारीख, वेळ मिळाली आहे अशानाच लसी मिळत होत्या. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना केंद्रावर येऊन परत जावे लागले आहेत.

पोलिस मुख्यालयातील केंद्र भुसावळला

पोलिस मुख्यालयात केवळ ४५ वर्षांवरील पोलिस कुटुंबीयांसाठी लसीकरण केंद्र सुरू होते. आता १ मेपासून १८ ते ४४ वयोगटांसाठी लसीकरण सुरू झाले. त्यात कोवीन ॲपवर केलेल्या नोंदणीत शहरातील कोणतेही केंद्र लसीकरणासाठी मिळते. पोलिस मुख्यालयातील केंद्रावर पोलिसांव्यतिरिक्त इतर नागरिकही लसीकरणासाठी येऊ लागल्याने पोलिस विभागाने हे लसीकरण केंद्र बंद करण्याचे सांगितले. यामुळे हे लसीकरण केंद्र बंद करून भुसावळला हलविण्यात आले आहे.

loading image