esakal | जळगाव जिल्ह्यात ‘बीटी’च हवी; सत्तावीस लाख पाकिटांची नोंद

बोलून बातमी शोधा

cotton BT seeds

जिल्ह्यात कपाशीला सहा हजारांपर्यंत गेल्या हंगामात भाव मिळाला. या मुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या मुळे यंदाच्या हंगामातही नगदी पीक म्हणून कपाशीचा पेरा सात लाख तीस हजार हेक्टरपर्यंत वाढणार आहे.

जळगाव जिल्ह्यात ‘बीटी’च हवी; सत्तावीस लाख पाकिटांची नोंद
sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : जिल्ह्यात कपाशीला पांढरे सोने म्हटले जाते. गत वर्षीच्या (२०२०) हंगामात कपाशीला चांगला भाव मिळाल्याने या वर्षीही कपाशीचा पेरा सात लाख ३० हजार हेक्टरपर्यंत पोचणार असून, त्यासाठी कृषी विभागाने शासनाकडे सव्वीस लाख ५० हजार पाकिटांची मागणी नोंदविली आहे. हे बियाणे मे महिन्यात उपलब्ध होणार आहे. गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, यूरिया खताचा वापर दहा टक्क्यांनी कपात करण्याबाबत धोरण असल्याने त्याप्रमाणे कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. 
जिल्ह्यात कपाशीला सहा हजारांपर्यंत गेल्या हंगामात भाव मिळाला. या मुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या मुळे यंदाच्या हंगामातही नगदी पीक म्हणून कपाशीचा पेरा सात लाख तीस हजार हेक्टरपर्यंत वाढणार आहे. तब्बल एक ते दीड लाख हेक्टर क्षेत्रावर अधिक पेरा होणार आहे. जिल्ह्यात २६ लाख ५० हजार बी.टी. बियाणे पाकिटांची मागणी शासनाकडे केली आहे. ही पाकिटे मे महिन्यात येतील. त्याची विक्री मे महिन्याच्या शेवटी व पेरणी जून महिन्यात करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. कपाशीची पेरणी जर मे महिन्यात केली तर त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव लवकर होण्याची शक्यता असते. उशिरा पेरण्या झाल्यानंतर बोंडअळी येणार नाही. आली तरी कमी प्रमाणात क्षेत्र बाधित होईल. गत हंगामात सप्टेंबरपर्यंत कपाशीवर बोंडअळी नव्हती. नंतर मात्र तिचा प्रादुर्भाव वाढला. गत वर्षी उशिरा पेरा केल्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव उशिराने झाला. 

राज्यात सर्वाधिक यूरियाचा वापर 
जळगाव जिल्ह्यात पिकांना यूरिया खते अधिक प्रमाणात देतात. जिल्ह्यात तब्बल साडेचार लाख टन यूरिया विकला जातो. राज्यात सर्वाधिक यूरिया विकणारा जिल्हा जळगाव आहे. यूरियाच्या अतिवापराने अन्नधान्यही सकस होत नाही. याला पर्याय म्हणून यूरियाचा वापर कमी करण्याबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे होय. दहा टक्के वापर कमी करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. 
 
जिल्ह्यात यंदा बी.टी. बियाण्यांची २६ लाख ५० हजार पाकिटांची मागणी करण्यात आली. बियाणे मे महिन्यातच उपलब्ध होणार असली तरी पेरण्या जून महिन्यात करण्याबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जाणार आहे. 
-संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

कपाशीला गत हंगामात हमीभाव पाच हजार ८०० मिळाला होता. त्यापेक्षा अधिक भाव खासगी व्यापारी आगामी हंगामात कपाशीला देतील. सध्या सहा हजार पाचशे भाव आम्ही देत होतो. आता मात्र कापूस शिल्लक नसल्याचे चित्र आहे. 
-प्रदीप जैन, अध्यक्ष, खानदेश जिनिंग प्रेसिंग ओनर्स असोसिएशन 

संपादन- राजेश सोनवणे