
रामलीला चौकातील विजय महाजन यांच्या घरातून त्यांच्या पत्नी सुरेखा यांचे चार लाख, ६१ हजार ३०२ रुपयांचे दागिने चोरीस गेले होते. या प्रकरणी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी घरातील सदस्यांना विचारपूस केली.
धरणगाव (जळगाव) : येथील मोठ्या वाड्यातील विजय महाजन यांच्याकडे झालेल्या चोरीचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावून चोराने विक्री केलेले सुमारे पाच लाखांचे दागिने हस्तगत केले. पोलिसांनी चार दिवसांपूर्वीच दुचाकी चोरीचे रॅकेट पकडले होते.
रामलीला चौकातील विजय महाजन यांच्या घरातून त्यांच्या पत्नी सुरेखा यांचे चार लाख, ६१ हजार ३०२ रुपयांचे दागिने चोरीस गेले होते. या प्रकरणी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी घरातील सदस्यांना विचारपूस केली. त्यावेळी नगरसेविका सुरेखा महाजन यांनी सांगितले, की सकाळी सातला मंदिरात जाते, तेव्हा कधी कधी घरात दुधवाला मुलगा दूध ठेवून जातो.
बुलेट घेतल्याचे दिसले अन् फसला
त्याने दोन- तीन दिवसांपूर्वी बुलेट घेतली आहे. या माहितीवरून पोलिसांनी दूध विकणारा संशयित मुलगा गजानन माळी (रा. मोठा माळीवाडा) यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने १५ जानेवारीला सकाळी सातच्या सुमारास घरातील कडी उघडून कपाटातून ८८ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची कबुली दिली. १८ जानेवारीस दागिने कजगाव (ता. भडगाव) येथील तीन सोनारांना मेव्हणा आबा चौधरी (रा. कजगाव) याच्या मदतीने विक्री केल्याचे सांगितले. यावरून पोलिस निरीक्षक हिरे यांनी गजानन माळी यास अटक केली.
सर्व दागिने झाले जमा
कजगाव येथून सोनाराकडून चोरीतील ब्रासलेट हस्तगत केले. रविवारी (ता. २४) इतर दोन सोनारांनी उर्वरित सोने पोलिसांकडे पंचासमक्ष जमा केले. या गुन्ह्यातील पूर्ण ८८ ग्रॅम सोने धरणगाव पोलिसांनी २४ तासांचे आत हस्तगत केले. दोन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता, बुधवार (ता. २७)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, प्रदीप पवार, मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, विजय धनगर, अंकुश बाविस्कर यांनी केली.
संपादन ः राजेश सोनवणे