धरणगाव पालिकेत १३ कोटींचा गैरव्यवहार; जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रार 

डी. एस. पाटील
Tuesday, 26 January 2021

मागील काही दिवसांपासून पालिकेतील १३ कोटींच्या गैरव्यवहाराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असल्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. नेमके हे प्रकरण काय होते, याची कुणालाही माहिती नव्हती.

धरणगाव : येथील पालिकेत १३ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे लेखापरीक्षणाद्वारे उघड झाल्याचा आरोप भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संजय महाजन, जितेंद्र महाजन यांनी केला आहे. 
मागील काही दिवसांपासून पालिकेतील १३ कोटींच्या गैरव्यवहाराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असल्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. नेमके हे प्रकरण काय होते, याची कुणालाही माहिती नव्हती. परंतु सोमवारी (ता. २५) भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अॅड. संजय महाजन व माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी याबाबत माहिती देत प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. राज्य शासनाचे आर्थिक विभागाचे अधिकृत लेखापरीक्षक अधिकारी यांनी २०१८-१९ या एका वर्षांत पालिकेत १३ कोटी ६६ लाख २४ हजार ४७९ रुपये अंतिम अमान्य, तर वसूलपत्र रक्कम चक्क १६ कोटी ३९ लाख तीन हजार १८३ रुपये असल्याचे आपल्या अहवालात म्हटले आहे, असे दोघांनी कळविले आहे. 

माहिती देण्यासही टाळाटाळ
माहिती अधिकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी माहिती अधिकारात जळगाव लेखापरीक्षण विभागाकडून धरणगाव पालिकेच्या लेखापरीक्षण अहवालाची माहिती मागितली होती. परंतु त्यांना माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तब्बल एक महिना फिरविल्यानंतर महाजन हे अपिलात गेले. अगदी स्वत: कायदेशीर मुद्द्यांवर युक्तिवाद केला. त्यानंतर त्यांना ही माहिती देण्यात आली. मला माहिती मिळू नये म्हणून मोठे राजकीय दबावतंत्र वापरण्यात आले असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. परंतु मोठ्या कष्टाने ही माहिती मिळविण्यात यशस्वी झालो. याबाबत आता लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे जितेंद्र महाजन यांनी सांगितले आहे. 

संगनमताने झाल्‍याचा आरोप
संजय महाजन यांनी म्हटले आहे, की काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात पोस्ट टाकल्यापासून यावर अभ्यास सुरू होता. ज्येष्ठ विधिज्ज्ञ अॅड. शरद माळी यांच्याकडून मुद्देसूद तक्रारी अर्ज तयार करण्याचे काम सुरू आहे. पालिकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून, हे सर्व संगनमताने झाले आहे, असा आरोप महाजन यांनी केला आहे. 

पुढील कारवाई लवकरच
अॅड. शरद माळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकरणाची योग्य चौकशी करून द बाँबे लोकल फंड ऑडिट रुल्स १९३१ चे सेक्शन चारनुसार नियुक्त झालेल्या लेखापरीक्षकांनी ताशेरे ओढलेल्या आक्षेपाधीन वसूलपात्र रकमेसंदर्भात कारवाई करणे उचित झाले असते. या प्रकरणात दोघे संयुक्त तक्रारदार अॅड. संजय महाजन व जितेंद्र महाजन हे माझे पक्षकार असून, लवकरच योग्य ती पुढील पावले उचलणार असल्याचे सांगितले. 
 
२०१८-१९ या वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालातील ही रक्कम आक्षेपार्ह आहे. याचा अर्थ गैरव्यवहार झाला असा नव्हे. काही कागदपत्रांची अपूर्णता असेल किंवा संबंधित लेखापरीक्षकांनी त्या वेळी ती सादर केली नसतील. त्यामुळे सदर रक्कम आक्षेपार्ह आहे, याचा अर्थ गैरव्यवहार होत नाही. याबाबत असलेली अपूर्णता पूर्ण केल्यानंतर सदर आक्षेप निकाली निघतो. 
- जनार्दन पवार, मुख्याधिकारी, धरणगाव 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news dharangaon palika 13 carrore fraud and collector complant