esakal | राज्याची राजधानी "ना"पास..सातारा आघाडीवर
sakal

बोलून बातमी शोधा

swahyay project

राज्याची राजधानी "ना"पास..सातारा आघाडीवर

sakal_logo
By
उमेश काटे

अमळनेर (जळगाव) : राज्यातील पहिली ते दहावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान वाढीसाठी शासनाने "स्वाध्याय" हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यात सातारा जिल्हा आघाडीवर असून राज्याची राजधानी मुंबई शहर, मुंबई उपनगर उपराजधानी नागपूर सह नाशिक व पुणे हे सर्वात शेवटी अर्थात पिछाडीवर आहेत. शिक्षणाचे माहेर घर व शिक्षणात अग्रेसर असलेल्या या शहरानी पाठ फिरवल्याने या उपक्रमात ते सपशेल "नापास" दिसून येत आहे.

कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद असल्यामुळे शासनाने ऑनलाइन उपक्रमांना प्राधान्यक्रम दिला. या पार्श्वभूमीवर शासनाने सुरुवातीला 'शाळा बंद पण शिक्षण सुरू' हा उपक्रम सुरू केला होता. त्यानंतर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत ३ नोव्हेंबर रोजी "स्वाध्याय" (स्टुडन्ट व्हाट्सअप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट योजना) या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यात सुमारे ३४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

प्रत्‍येकी दहा प्रश्‍न

विद्यार्थ्यांनी संबंधित आठवड्यात सोडवलेल्या व्हॉटसॲप स्वाध्यायसाठी सर्व विषयावर प्रत्येकी १० प्रश्न विचारले जातात. बहुपर्यायी प्रश्नावली असल्यामुळे तसेच १० पैकी किती गुण मिळतात यासाठी विद्यार्थी आनंदाने प्रश्न सोडवतात. प्रत्येक विषयाची अन्सर की (उत्तरपत्रिका)उपलब्ध करून देण्यात आली आहे. न समजलेला भाग किंवा प्रश्न संबंधित वर्गशिक्षकांकडून समजून देण्यात येतो.

१५ मे पासून नवीन उपक्रम

प्रत्येक आठवड्यात एक स्वाध्याय दिला जातो. सध्या "स्वाध्याय" या उपक्रमाचा २४ आठवडा नुकताच संपला आहे. या आठवड्यात स्वाध्याय होणार नसून येत्या १५ मे पासून व्हाट्स अँप स्वाध्याय च्या माध्यमातून वेगळा उपक्रम सूरु केला जाणार आहेत. या बाबतच्या सूचना शिक्षक व विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत.

राज्यातील "टॉप टेन" जिल्हे

स्वाध्याय (आठवडा २४) मधील

१)सातारा- ८२.७१%

२)बुलढाणा- ५४.९२%

३) सोलापुर- ५०.७३%

४) सांगली- ५०.२८%

५) उस्मानाबाद- ४८.८३%

६)परभणी- ३७.९०%

७)वाशीम- ३५.८४%

८)जळगाव- ३५.१९%

९)जालना- ३४.०९%

१०) यवतमाळ- ३०.०८%

राज्यातील "बॉटम टेन" जिल्हे

स्वाध्याय (आठवडा-२४) परिस्थिती

१)मुंबई शहर- ०.१८%

२)गडचिरोली- ०.७२%

३)पालघर- ०.९२%

४)मुंबई (उपनगर)- १.४८%

५)नागपुर- १.७४%

६)नाशिक- १.९५%

७)पुणे- २.४३%

८)नंदुरबार- २.४५%

९)रायगड- २.९६%

१०)लातूर- ३.१९%

loading image