तब्‍बल पाचशे थकबाकीदारांना नोटिसा; कर न भरणाऱ्यांची नावे लागणार चौकात 

समीर तडवी
Friday, 15 January 2021

फैजपूर शहरात घर मालमत्ताधारक सहा हजार ५००, तर नळधारक चार हजार ६०० इतकी संख्या आहे. यात पालिकेची पाणीपट्टी कराची वार्षिक मागणी एक कोटी तीन लाख १४, तर मालमत्ताकराची घरपट्टी अडीच कोटी इतकी आहे.

फैजपूर (जळगाव) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मंदीने लॉकडाउनमुळे सर्वच आर्थिक व्यवहार थांबल्याने फैजपूर पालिकेची घरपट्टी व पाणीपट्टी कराच्या वसुलीलाही फटका बसला. मात्र, लॉकडाउन संपल्यावर अनलॉकमध्ये सद्य:स्थितीत पालिकेच्या विविध करांच्या वसुलीला सुरवात करण्यात आली आहे. जवळपास पाचशे थकबाकीदार नळधारक व मालमत्ताधारकांना कराची रक्कम भरण्यासाठी पालिकेने नोटिसा दिल्या आहेत. 
फैजपूर शहरात घर मालमत्ताधारक सहा हजार ५००, तर नळधारक चार हजार ६०० इतकी संख्या आहे. यात पालिकेची पाणीपट्टी कराची वार्षिक मागणी एक कोटी तीन लाख १४, तर मालमत्ताकराची घरपट्टी अडीच कोटी इतकी आहे. पालिकेकडून गेल्या वर्षी २०२० चा मार्च महिना संपण्याच्या अगोदर लॉकडाउन सुरू झाल्याने पालिकेच्या करवसुलीचे नियोजन कोलमडल्याने पालिकेच्या येणाऱ्या मालमत्ता वसुलीचा आर्थिक स्रोतदेखील लॉकडाउन झाला. व्यवहार थांबल्याने ‘मार्च एंडिंग’चे आर्थिक वर्षअखेरचे गणित बिघडले. त्यामुळे पालिकेच्या वित्तीय वर्ष २०१९-२० मध्ये घरपट्टी व पाणीपट्टी कराच्या वसुलीलाही फटका बसला. 

अनलॉकनंतरही कर भरण्यास टाळाटाळ
आता अनलॉक असल्याने व्यवसाय धंदे, मजूर कामे हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने पालिकेने विविध करांच्या वसुलीला सुरवात केली आहे. यात २०२०-२१ या नवीन वर्षाची पाणीपट्टी वसुलीची बिले नळधारकांना वाटप करण्यात आली आहेत. मात्र, अनेक नळधारक व मालमत्ताधारकांना कराची रक्कम भरणा केली नाही; म्हणून पालिकेने पाचशेपेक्षा जास्त थकबाकीदार नळधारक व मालमत्ताधारकांना पालिकेकडून थकबाकी त्वरित जमा करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यात नळधारकांनी पाणीपट्टी थकबाकी रक्कम सात दिवसांच्या आत भरणा न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता नळ कनेक्शन बंद करण्यात येऊन खर्चासह रक्कम वसूल करण्याची कारवाई केली जाईल, असे नमूद केले आहे. या नोटिसा हद्दीबाहेरील नळधारकांनाही देण्यात आल्या आहेत. 

गाळेही सील होणार 
फैजपूर पालिकेकडून थककीदार गाळेधारकांना महिनाभरापूर्वीच गाळेभाड्याच्या थकबाकीची रक्कम भरण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. यातील थककीदार गाळेधारकांनी अद्यापही गाळेभाड्याची थकबाकीची रक्कम भरणा न केल्याने थकबाकीदार गाळेधारकांचे गाळे सील करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका वसुली विभागाने सांगितले. सुटीच्या दिवशीदेखील पालिकेत करवसुली सुरू आहे. करवसुलीचे काम मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरीक्षक बाजीराव नवले, वसुली लिपिक उल्हास चौधरी, रमेश सराफ, मनोहर चौधरी, विलास सपकाळे पाहत आहेत. 

थकबाकीदारांना नोटिसा दिल्या आहेत. थकबाकी न भरल्यास थकबाकीदार नळधारकांचे नळसंयोजन बंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. तरी पुढील कारवाईचा कटू प्रसंग टाळण्यासाठी त्वरित थकबाकी भरावी व पालिकेला सहकार्य करावे. 
-किशोर चव्हाण, मुख्याधिकारी, फैजपूर पालिका 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news faizpur palika notice to five hundred arrears