
फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर आत्मनिर्भर निधी विशेष कर्ज पुरवठा अंतर्गत फैजपूर शहरातील सर्व रस्त्यावरील फेरीवाल्यांना कर्ज स्वरुपात सात टक्के व्याजदराने बँकेकडून उपलब्ध करून दिले जात आहे
फैजपूर (जळगाव) : केंद्र शासनाच्या दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत फैजपूर पालिकेतर्फे पंतप्रधान पथविक्रेता (फेरीवाले) आत्मनिर्भर स्वःनिधी योजना राबविण्यात येत आहे. या माध्यमातून ९२ विविध फेरीवाल्यांना प्रत्येकी दहा हजार कर्ज स्वरुपात बँकेकडून उपलब्ध करून दिले आहे, अशी माहिती फैजपूर पालिकेचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रवीण सपकाळे यांनी दिली.
फैजपूर पालिकेतर्फे या योजनेंतर्गत फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर आत्मनिर्भर निधी विशेष कर्ज पुरवठा अंतर्गत फैजपूर शहरातील सर्व रस्त्यावरील फेरीवाल्यांना कर्ज स्वरुपात सात टक्के व्याजदराने बँकेकडून उपलब्ध करून दिले जात आहे. कोरोनाच्या महामारीच्या कालावधीत पथविक्रेत्यांचे व्यवसाय ठप्प झाले होते.
९२ जणांना मदत
या परिस्थितीतून व्यवसाय सावरण्यासाठी या योजनेंतर्गत फैजपूर शहरातील पथविक्रेते फेरीवाले बांधवांना दहा हजार प्रमाणे विशेष सुक्ष्म पतपुरवठा करण्यात येत आहे. या साठी १२४ पथविक्रेते फेरीवाल्यांचे पालिकेला फार्म उपलब्ध झाले होते. या पैकी ९२ फेरीवाल्यांना प्रत्येकी दहा हजार रुपये प्रमाणे विशेष पथ पुरवठा करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत देण्यात येत असलेल्या आत्मनिर्भर निधी अंतर्गत मिळणाऱ्या विशेष पथ पुरवठ्यामुळे फैजपूर शहरातील गरजू फेरीवाले बांधवांच्या व्यवसायांना चालना मिळणार आहे.
पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेंतर्गत पालिकेतर्फे ९२ जणांना प्रत्येकी दहा हजार प्रमाणे निधी वितरित करण्यात आला आहे. तर फार्म उपलब्ध असलेल्या पथविक्रेत्यांना निधी वितरित केला जात आहे. पालिकेकडून करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात पथविक्रेत्यांनी नोंद केली नसेल त्यांनी पालिकेकडे नोंद करून घ्यावी.
- प्रवीण सपकाळे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, फैजपूर पालिका
संपादन ः राजेश सोनवणे