esakal | शेतकऱ्यांसाठी डिझेल आपल्या दारी; गावांमध्ये जातेय ट्रँकर

बोलून बातमी शोधा

farmer petrol pump
शेतकऱ्यांसाठी डिझेल आपल्या दारी; गावांमध्ये जातेय ट्रँकर
sakal_logo
By
भुषण बिरारी

पातोंडा (ता.अमळनेर) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाऊन काळात शेतकरी व ट्रॅक्टर मालकांसाठी भारत पेट्रोलियम धरणगाव यांनी डिझेल व्हॅनच्या स्वरूपात घरपोच डिझेल सेवा सुरू केली आहे.

शेतीची उन्हाळी मशागत सुरू आहे. लॉकडाऊन काळात शासनाने पेट्रोलपंपच्या वेळा निश्चीत केल्या आहेत. तसेच एकीकडे शेतकरी व ट्रॅक्टर मालकांमध्ये कोरोना संसर्गाची भिती असतांना भारत पेट्रोलियमचे डिलर महंमद बोहरी यांनी त्‍यांच्या धरणगाव येथील पेट्रोलपंपाच्या माध्यमातून डिझेल व्हॅनने शेतकऱ्यांना घरपोच डिझेल सेवा सुरू केली आहे.

एक ट्रँकर पाच गाव

माध्यमातून सदर डिझेल व्हॅन ही पातोंडा येथे सकाळी दहाच्या सुमारास येते. त्यावेळी उपस्थित शेतकरी व ट्रॅक्टर चालकांना अर्धा ते एक तास डिझेल वाटप केले जाते. सदर डिझेल व्हॅनची क्षमता चार हजार लिटरची असल्याने व्हॅनमार्फत साळवा, नांदेड, साकरे, निशाणे, दहिवद आदी गावांना देखील डिझेल पुरवठा केला जातो. डिझेल व्हॅनद्वारे घरपोच डिझेल प्राप्त होत असल्याने सदर गावातील शेतकरी व ट्रॅक्टर मालक महंमद बोहरी यांचे आभार व्यक्त करीत आहेत.

पावसाळा सुरू होईपर्यंत सर्व्हिस

शेतकऱ्यांना घरपोच डिझेल पुरवत असून डिझेल माप व डिझेल दराबाबत शंका असल्यास त्याची खात्री करण्याचे आव्हान आम्ही शेतकऱ्यांना करत असतो. पावसाळा सुरू होईपर्यंत सदर सेवा पुरवणार असल्याची माहिती डिझेल व्हॅन व्यवस्थापक व चालक लक्ष्मण महाजन यांनी दिली. पातोंडा व गावातील शेतकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन भारत पेट्रोलियम धरणगाव यांचे मार्फत करण्यात येत आहे.

संपादन- राजेश सोनवणे