
विजयी उमेदवारांचे गावकरी औक्षण करणार असल्याने गल्लीतून जात असताना संशयितांनी हातात तलवार, लोखंडी रॉड व लाठ्या काठ्या घेऊन मारहाण करण्याच्या व जीवे ठार मारण्याचे इराद्याने एकत्र आले.
मेहुणबारे (जळगाव) : लांबेवडगाव (ता. चाळीसगाव) येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटामध्ये धुमश्चक्री उडाली. यात तलवारी, कोयते, लाठ्या काठ्यांचा वापर करण्यात आला. या हाणामारीत दोन्ही गटातील तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी परस्परांच्या विरोधात मेहुणबारे पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे.
लांबेवडगाव (ता. चाळीसगााव) ग्रामपंचायत निवडणुकीत फिर्यादी प्रकाश निळकंठ पाटील यांचे पॅनल विजयी झाले. विजयी उमेदवारांचे गावकरी औक्षण करणार असल्याने गल्लीतून जात असताना संशयितांनी हातात तलवार, लोखंडी रॉड व लाठ्या काठ्या घेऊन मारहाण करण्याच्या व जीवे ठार मारण्याचे इराद्याने एकत्र आले. यातील संशयित संतोष पाटील याने लोखंडी रॉड प्रकाश पाटील यांच्या डोक्यात मारला व उजव्या खाांद्यावरही मारून दुखापत केली. तर सोमसिंग पाटील याने कोमलसिंग रामसिंग पाटील यांच्या डोक्यात तलवार मारून गंभीर दुखापत केली. दोघांनी कोमलसिंग पाटील यांच्या अंगावर लोखंडी रॉड व काठीने मारहाण केली. इतर आरोपींनी लोखंडी रॉड व काठ्यांनी साक्षीदाराला मारहाण करून दुखापत केली. ही घटना काल (ता. १८) सायंकाळी साडेचारच्या सुमारास ॲड. हर्षल पाटील यांच्या घरासमोर घडली. याप्रकरणी प्रकाश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष पाटील, सोमसिंग पाटील, योगेश पाटील, मंगलसिंग पाटील, मानसिंग पाटील, संजय पाटील, अमरसिंग पाटील, केतनसिंग पाटील, भगवान पाटील, सुमेरसिंग पाटील, हेमंत पाटील, निलेश पाटील, विजयसिंग पाटील, अरूण पाटील, लखनसिंग पाटील, कुणाल पाटील, महेंद्र पाटील, महेश पाटील, रविंद्र पाटील, भूषण पाटील, बिजेसिंग पाटील, अजय पाटील, देवराज पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले हे करीत आहेत.
नऊ जणांना अटक
घटनेतील गंभीर जखमी कोमलसिंग पाटील यांना चाळीसगाव शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. गुन्ह्यातील २३ पैकी ९ संशयितांना पोलीसांनी अटक केली. दरम्यान, दुसऱ्या गटाचे तक्रारदार मानसिंग राजपूत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आरोपी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांनी मिरवणूक काढली व पराभूत उमेदवार आणि फिर्यादी मानसिंग पाटील यांच्या घरासमोर त्यांच्या विरोधात चिथावणीखोर घोषणा देऊन फटाके फोडले. त्याचा जाब मानसिंग पाटील यांनी विचारला असता, प्रकाश पाटील व रवींद्र पाटील यांनी कोयत्याने मानसिंग पाटील यांच्या डोक्यावर मारून दुखापत केली. तर इतरांना शिवीगाळ व चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना तीनच्या सुमारास मानसिंग पाटील यांच्या घरासमोर घडली. याप्रकरणी मानसिंग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित प्रकाश पाटील, वंदना पाटील, सुरेखा पाटील, जयसिंग पाटील व रवींद्र पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले हे करीत आहेत.
वकीलाच्या घरावर हल्ला
गावातील अॅड. हर्षल पाटील यांच्या घरावर हल्ला करून घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून घरातील सामानाची नासधूस करून हर्षल पाटील यांचे वडील व पत्नीला धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ॲड. पाटील यांच्या फिर्यादीवरून वजेसिंग पाटील, निंबा पाटील, योगेश पाटील, देवराज पाटील, अनिल पाटील, महेंद्र पाटील या सहा जणांच्या विरोधात मेहुणबारे पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास हवालदार शिंदे हे करीत आहेत. या घटनेचा निषेध म्हणून आज चाळीसगाव न्यायालयात वकील बांधवांनी काळ्या फिती लावून आपल्या सहकाऱ्याच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.
संपादन ः राजेश सोनवणे