
ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून प्रमुख पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अर्ज भरल्यानंतर आज माघारीचा अंतिम दिवस होता. पण ग्रामपंचायतीकरीता सर्व पक्षीय उमेदवार एकवटले आणि सर्वांनी एकत्रितपणे माघारी घेतली.
जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत निवडणूकीतून नशिराबादमधील सर्व उमेदवारांनी माघार घेतली. अर्थात नशिराबाद ग्रामपंचायत लवकरात लवकर नगरपंचायत व्हावी; यासाठी सर्व पक्षीय उमेदवारांनी माघार घेतल्याचे जि.प.चे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी सांगितले.
नशिराबाद ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा होता. या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्याची उद्घोषणा २९ डिसेंबर २०२० रोजी नगर विकास विभागाने केली होती. असे असताना देखील निवडणुक आयोगाने नशिराबाद ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम लावला. या कार्यक्रमानुसार इच्छुक उमेदवारांनी अर्ज देखील दाखल केले होते. परंतु, रविवारी (ता.३) सर्वपक्षीय उमेदवारांची एकत्रित बैठक घेत माघार घेण्याबाबत एकमत निश्चित करण्यात आले.
गावकऱ्यांनी केला होता जल्लोष
नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्याची घोषणा झाल्यानंतर गावकऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष व आनंद व्यक्त केला होता. अशात निवडणुकीचा कार्यक्रम लागल्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक लढायची की, नगर पंचायत होवू द्यायची अशा द्विधा मनस्थितीत ग्रामस्थ होते. अशा स्थितीत अगदी भाजप, महाविकास आघाडी ते एमआयएमच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
मग ८२ उमेदवारांनी घेतली माघार
नगरपंचायत होणारच; पण ग्रामपंचायत निवडणूक खर्चही होईल म्हणून निवडणूक आयोगाकडे नगर विकास खात्याने ग्रामपंचायत निवडणूक पुढे लांबवावी म्हणून पत्र देण्यात आले होते. परंतू ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया कायम राहिली. त्यामुळे नाशिराबादकरांनी आज एकत्र येत निवडणुकी न लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज निवडणुकीतून सर्व ८२ उमेदवारांनी माघार घेतली. ग्रामपंचायत निवडणूक स्थगितीबाबत शासनाने कुठलीही भूमिका जाहिर न केल्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांनी एकत्रित येत निर्णय घेत माघार घेतल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी सांगितले.