Gram Panchayat Result अमळनेर तालुक्यात दिग्गजांना धोबी पछाड; ग्रामपंचायतीची धुरा तरुणांच्या हाती, राष्‍ट्रवादी, भाजप, सेनेचे पॅनल पडले

योगेश महाजन
Monday, 18 January 2021


राष्‍ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेच्या दिग्‍गन नेते असलेल्‍यांना अमळनेर तालुक्‍यात मोठा धक्‍का बसला आहे. ग्रामपंचायत स्‍तरावर मोठ्या पक्षाच्या पॅनलला नागरीकांना नापसंती दर्शवत नवीन पॅनल आणि तरूणांना यात संधी देण्यात आली आहे.

अमळनेर (जळगाव) : तालुक्यात 14 ग्रामपंचाय बिनविरोध झाल्या असून, 50 ग्रामपंचायतींची मतमोजणी आज येथील इंदिरा भुवन येथे शांततेत पार पडली. या निवडणुकीत तरुणांना जनतेने संधी दिली असून, दिग्गज व प्रस्थापित म्हणविल्या जाणाऱ्या पॅनल प्रमुखांना धोबी पछाड केले आहे. 
निंभोरा येथील किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पिरन पाटील यांचे पॅनल पराभूत होऊन सानेगुरुजी स्मारकचे कार्यकर्ते प्रा. सुनील पाटील व समाधान धनगर यांचे पॅनल विजयी झाले. त्यांच्या 6 जागा आल्या आहेत. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे यांच्या गडखाम्ब गावात बापूराव खुशाल पाटील यांचे पॅनल विजयी झाले असून त्यांना 9 जागा मिळाल्या आहेत. खवशी येथील काँग्रेस किसान सेलचे तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांचे पॅनल पराभूत होऊन त्यांच्या विरोधातील श्यामकांत देशमुख यांचे पॅनल विजयी झाले; त्यांना 6 जागा मिळाल्‍या आहेत.  

राष्‍ट्रवादीच्या नेत्‍यांना धक्‍का
शिरूड येथे राष्ट्रवादीच्या नेत्या जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील व शेतकी संघाचे माजी अध्यक्ष महेंद्र पाटील यांचे पॅनल पराभूत होऊन भाजपचे पं.स. सभापती श्याम अहिरे यांचे पॅनल विजयी झाले आहे. डांगरी येथील राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी सरपंच अनिल शिसोदे यांचे पॅनल पराभूत होऊन दिनेश शिसोदे यांचे पॅनल विजयी झाले आहे. सात्री येथे भाजपचे महेंद्र बोरसे यांचे पॅनल विजयी झाले आहे. झाडी येथे काँग्रेसचे धनगर दला पाटील यांच्या पॅनललाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तेथे डॉ. भुपेंद्र पाटील यांचे पॅनल विजयी झाले आहे. तर लोण चारम येथे भाजपचे महेश पाटील यांचे पॅनल पराभूत होऊन विरोधकांनी सर्व 5 जागांवर विजय मिळवला आहे. 

इथे राहिला राष्‍ट्रवादीचा झेंडा
पाडळसरे येथे मात्र राष्ट्रवादीचे भागवत पाटील यांचे पॅनल विजयी झाले आहे. अंचलवाडी येथे राष्ट्रवादीचे विकास पाटील यांच्या पॅनलने पूर्ण 7 जागांवर विजय मिळवला आहे. चौबारी येथे शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील यांचेही पॅनल पराभूत झाले आहे त्र्यंबक पाटील यांचे पॅनल विजयी झाले आहे. कळमसरे येथे राष्ट्रवादीचे पिंटू राजपूत यांचे पॅनल विजयी झाले. तर माजी सरपंच मुरलीधर महाजन यांचे पॅनल पराभूत झाले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news gram panchayat election result amalner taluka