दुपारी तीनपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे निकाल येणार हाती; अशी असेल मतमोजणी

देवीदास वाणी
Sunday, 17 January 2021

जिल्ह्यात १५ जानेवारीस ७८३ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. त्यापैकी ९२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे ६७८ ग्रामपंचायतीसाठी जिल्ह्यात ७८.११ टक्के मतदान झाले होते.

जळगाव : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या उत्साहात मतदारांनी मतदान केल्यानंतर उद्या (ता.१८) निकाल जाहीर होणार आहे. निकालाबाबत सर्वच ग्रामपंचायतीत कमालीची उत्सुकता आहे. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून सकाळी दहापासून मतमोजणी सुरू होईल. 

जिल्ह्यात १५ जानेवारीस ७८३ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. त्यापैकी ९२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यामुळे ६७८ ग्रामपंचायतीसाठी जिल्ह्यात ७८.११ टक्के मतदान झाले होते. सर्वत्रच अतिशय चुरशीच्या लढती झाल्या आहेत. दोन हजार ४१५ मतदान केंद्रांवर मतदान झाले. जिल्ह्यात ६८७ ग्रामपंचायतींसाठी एकूण १३ लाख ११ हजार ८४७ मतदार होते. त्यापैकी दहा लाख २४ हजार ६८३ मतदारांनी मतदान केले. त्यात पुरुष पाच लाख ३८ हजार ५९५, तर महिला चार लाख ८६ हजार ५४ एवढ्या मतदारांनी मतदान केले. एकूण ७८.११ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान जामनेर तालुक्यात ८२.४५ टक्के, तर सर्वांत कमी मतदान भुसावळ तालुक्यात ६७.९६ टक्के झाले. 

मतमोजणीचे प्रथम प्रात्‍यक्षिक
जिल्ह्यात पंधरा तालुक्यात काही ठिकाणी तहसील कार्यालयात मतमोजणी केंद्र आहेत. तर काही ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी मतमोजणी केंद्र आहे. सर्वच ठिकाणी आज तहसीलदारांनी मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रात्यक्षिके करून दाखविले. मतमोजणी करावयाची याबाबत मार्गदर्शन केले. 

जळगावला पहिला निकाल शिरसोलीचा 
जळगाव तालुक्याची मतमोजणी नूतन मराठा महाविद्यालयात होणार आहे. त्यासाठी एकूण दहा टेबलावर मतमोजणी होणार आहे. एकावेळी दहा टेबलावर मतमोजणी होईल. एका टेबलावर तीन कर्मचारी असतील. त्यावर पर्यवेक्षक असेल. एकावेळी सर्व टेबलावर एकाच ग्रामपंचायतीची मतमोजणी होईल. एकूण १८ फेऱ्यात मतमोजणी होईल. सुरवातीस शिरसोली प्रबो, शिरसोली प्रन, म्हसावद, आवार, तुरखेडा, नांद्रा खु खापरखेडा, असोदा, ममूराबाद, कानळदा अशा ग्रामपंचायतीची मतमोजणी हेाईल. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news gram panchayat election result tomarrow