esakal | एकाच रूग्‍णाचे दोन रक्‍तगट; प्लाझ्मा देताना उडाला गोंधळ
sakal

बोलून बातमी शोधा

blood plasma

एकाच रूग्‍णाचे दोन रक्‍तगट; प्लाझ्मा देताना उडाला गोंधळ

sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत असतांना उपचारातील निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला. एका रूग्णाला प्लाझ्माची आवश्यकता असतांना सिव्हील हॉस्पीटल आणि रेडक्रॉस सोसायटी या दोन्हींमध्ये त्या रूग्णांचे वेगवेगळा रक्‍तगट आला. यामुळे निर्माण झालेल्या गोंधळात रूग्‍णाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्‍यता होती.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जिल्हा कोविड रुग्णालय) दाखल असलेल्या एका महिला रुग्णाला चुकीचा प्लाझ्मा देत असल्याचा प्रकार सोमवारी (ता. ३) उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या सतर्कतेने उघडकीस आला. वेळीच रक्तगटाबाबत माहिती मिळाल्याने रुग्णाला प्लाझ्मा देण्यापासून थांबविण्यात आले. अन्यथा रुग्णाच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला असता.

घडला प्रकार असा होता..

एका महिला रूग्णावर जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या महिलेवरील उपचारासाठी प्लाझ्माची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सुचविले. सदर महिलेच्या नातलगांना रूग्‍ण महिलेच्या रक्‍तगटाबाबत माहिती नव्हती. यामुळे जिल्हा रूग्णालयात चाचणी करून संबंधीत महिलेला एबी पॉझिटीव्ह या रक्तगटाचा प्लाझ्मा हवा असल्‍याचे सांगण्यात आले. यानुसार महिलेचा मुलगा रेडक्रॉस सोसायटीत गेला असता येथील तंत्रज्ञांनी महिलेचा रक्तगट बी पॉझिटीव्ह असा असल्याने त्यांना याच रक्तगटाचा प्लाझ्मा लागेल असे सांगितले. यामुळे प्लाझ्मा एबी पॉझिटीव्हचा घ्यावा की बी पॉझिटीव्हचा असा मुलाच्या मनात गोंधळ उडाला.

उपमहापौर पाटील रूग्‍णालयात

सदर प्रकाराबाबत रूग्णाच्या मुलाने उपमहापौर कुलभूषण पाटील यांना कळविले. या प्रकाराची माहिती मिळताच उपमहापौर पाटील हे रूग्णालय आले. येथे त्यांनी डॉक्टरांना विचारणा करत कोरोनाच्या उपचारामध्ये प्लाझ्मा थेरपी ही महत्वाची असली तरी संबंधीत रूग्णाचा रक्तगट असेल त्याच रक्तगटाचा प्लाझ्मा आवश्यक असतो. मात्र दुसऱ्या रक्तगटाचा प्लाझ्मा दिला; तर रूग्णावर साईड इफेक्‍ट होवून जीव गेला असता, त्‍यास जबाबदार कोण अशी विचारणा करत डॉक्‍टरांना धारेवर धरले.

तर रूग्‍णाचा जीव गेला असता

शासकिय वैद्यकिय महाविद्यालय रूग्‍णालयातील कर्मचाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे महिला रूग्णाच्या प्राणावर बेतले असते. उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी याबाबत सांगितले, की सदर घटनेस टेक्निशियन जबाबदार असून त्याच्यावर नक्कीच कारवाई करू. यानंतर पुढे अशी घटना घडणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या जागृतीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला व रुग्णाचे प्राण वाचू शकले.

loading image