esakal | टाटाचे बनावट मीठ; कंपनीनेच टाकली धाड, साडेसात क्‍विंटल माल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

tata solt duplicate product

बनावट टाटा नमकची कारवाई दस्तुरखुद टाटा कंपनीनेच नेमलेल्या खासगी स्वतंत्र तपासणी यंत्रणेने केली.

टाटाचे बनावट मीठ; कंपनीनेच टाकली धाड, साडेसात क्‍विंटल माल जप्त

sakal_logo
By
सुरेश महाजन

जामनेर (जळगाव) : शहरातील होलसेल किराणाचे व्यापारी राजू कावडिया यांच्या मयूर नावाच्या दुकानात बनावट टाटा नमक (मीठ)चा साठा आढळून आला. तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ५० किलोच्या १५ गोण्या असा एकूण साडेसात क्विंटल माल जप्त केला आहे. येथील पोलिस ठाण्यात बनावट मीठ विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

बनावट टाटा नमकची कारवाई दस्तुरखुद टाटा कंपनीनेच नेमलेल्या खासगी स्वतंत्र तपासणी यंत्रणेने केली. आय. पी. इनव्हेस्टीगेशन कंपनीच्या पथकातील वरिष्ठ तपास अधिकारी जावेद पटेल, सन्वेश उपाध्याय, अब्दुल्ला खान, मोहंमद चौधरी, अनिल मोरे आणि जामनेरचे पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील, हवालदार नीलेश घुगे, तुषार पाटील, सचिन चौधरी आदींनी मयूर किराणाच्या पळासखेडा (ता. जामनेर) येथील गुदामाची पाहाणी केली. त्यानंतर होलसेल किराणावर येऊन तेथील प्रत्येकी ५० किलोच्या १५ बनावट मीठाच्या गोण्या ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणल्या. 

टाटा कंपनीनेची घेतली दखल
शहरातील कावडिया परिवार व्यापारी वर्गात प्रतिष्ठेचा मानला जातो. मात्र, त्यांच्याकडे आठवडे बाजाराच्या दिवशीच तपासणी पथक आल्याच्या वृत्ताने चांगलीच खळबळ उडाली. तसे पाहिले, तर शहरासह तालुकाभरात कोरोना लॉकडाउनचा गैरफायदा घेऊन खाद्यतेलासह बहुतांश वस्तु- पदार्थांमधे भेसळीच्या तक्रारी अन्न भेसळ प्रतिबंधक प्रशासनाकडे करण्यात आल्या. मात्र, त्यावर संबंधित विभागाने कुठे व काय कारवाई केली, याबाबत कुणालाही अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. मात्र, टाटा कंपनीनेच स्वतः दखल घेऊन मयूर किराणावर बनावट ग्राहक पाठवून नकली मिठाचा पर्दाफाश केला. 

गेल्या २० वर्षांपासून माझ्याकडे टाटा नमक कंपनीची तालुका विक्रेता म्हणून कोमल एजन्सी नावाने मान्यता आहे. माझ्या गुदामात १२०० मिठाच्या गोण्या शिल्लक आहेत. दुकानातील गोण्यांबाबत त्यांना शंका असून, बनावट माल विकण्याचा प्रश्नच नाही. 
- राजू कावडिया, संचालक, मयूर किराणा, जामनेर 
 
टाटा मिठाच्या गोण्या आणि एक किलोचे पाऊच तपासणी अंती आम्हाला १०० टक्के बनावटबाबत पक्की शंका असल्याने कारवाई केली 
- जावेद पटेल, तपास अधिकारी, टाटा कंपनी, मुंबई  

संपादन ः राजेश सोनवणे

loading image