बनावट ‘टाटा नमक’ प्रकरणाला राजकीय वळण; व्हॉटसअप संदेशाने खळबळ  

सुरेश महाजन
Sunday, 24 January 2021

किराणावरून घेतलेला मिठाचा साठा गायब केला वा त्याला ताबडतोब नष्ट केला, तर दुसरीकडे धास्तीने काहींनी भेसळयुक्त तेलाचा दुकानात विक्रीसाठी उपलब्ध असलेला साठाही अचानक तत्काळ कर्मचाऱ्यांच्या मदतीने अन्यत्र हलविला हे येथे उल्लेखनीय. 

जामनेर (जळगाव) : शहरातील प्रसिद्ध व्यापारी राजकुमार ऊर्फ राजू कावडियांच्या टाटा नमक (मीठ) बनावट प्रकरण आता राजकीय स्तरावर जाऊन बनावट आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थ आपल्या बडेजावाखाली विकून व फसवणुकीने जनतेच्या जिवाशी खेळून भरमसाठ माया कमावणाऱ्या व राजकीय वरदहस्त असलेल्या राजू कावडियांसारख्यांना त्यांच्या अन्य कारभाराबाबतही कठोरात-कठोर पायबंद बसावा, यासाठी तपास यंत्रणेने पुढाकार घ्यावा, असा संदेश व्हॉट्सअप व अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. 

व्हॉटसअपवरील संदेश काँग्रेसच्या अश्पाक पटेल यांनी प्रसारित केला आहे. या संदेशात पटेल यांनी कावडिया परिवारासह इतरांनाही लक्ष करून त्यांच्याकडे असलेल्या पतसंस्था, शैक्षणिक संस्था यावरही प्रहार करून यांना राजकीय वरदहस्त असल्यानेच यांचा वरील सर्व क्षेत्रामध्ये गोरखधंदा बिनधास्त सुरू ठेवून गोरगरीब जनतेच्या जिवाशी खेळून पैसा कमावला जात असल्याचाही मुद्दा यामध्ये देण्यात आला आहे. 

अधिकाऱ्यांकडून पाहणी 
कोमल एजन्सीचे संचालक राजू कावडियांच्या विविध ठिकाणांवर जाऊन शनिवारी (ता. २३) पोलिस अधिकारी आणि संबंधित तपास संस्था यांनी पुन्हा पाहणी केली. त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील सोबत होते. बनावट टाटा मीठ प्रकरण उघडकीस येताच अनेकांनी आपल्या दुकानातील मयूर किराणावरून घेतलेला मिठाचा साठा गायब केला वा त्याला ताबडतोब नष्ट केला, तर दुसरीकडे धास्तीने काहींनी भेसळयुक्त तेलाचा दुकानात विक्रीसाठी उपलब्ध असलेला साठाही अचानक तत्काळ कर्मचाऱ्यांच्या मदतीने अन्यत्र हलविला हे येथे उल्लेखनीय. 

कारखान्याची चौकशी व्हावी 
बनावट टाटा नमक प्रकरण उघडकीस आले. मात्र, त्याचा निर्माता कोण? याचाही संबंधितांनी शोध घेऊन पर्दाफाश करावा. नकली पाऊचमध्ये हलक्या दर्जाचे मीठ घालून टाटाच्या नावावर खपवणाऱ्यांच्या कारखान्यावरही प्रशासनाने कारवाई करावी, अशी रास्त अपेक्षा या प्रकरणामुळे व्यक्त होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news jamner texture tata salt in political issue and social media massage viral