esakal | नदीकाठच्या गावांत संसर्ग; वाळू उत्खननाने कोरोनाला निमंत्रण
sakal

बोलून बातमी शोधा

girna river

नदीकाठच्या गावांत संसर्ग; वाळू उत्खननाने कोरोनाला निमंत्रण

sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाने धोक्याची पातळी केव्हाच ओलांडली असून, जीवन-मृत्यूचा खेळ सुरू आहे. अत्यावश्‍यक सेवेला सकाळी सात ते अकरा चार तासांचे बंधन घालणाऱ्या प्रशासनाकडून मात्र वाळू उत्खनन आणि वाहतुकीला प्रोत्साहन दिले जात असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. गिरणा नदीपात्रातून होणाऱ्या अधिकृत व अनधिकृत वाळू उत्खननामुळे कोरोनाला निमंत्रण मिळत आहे. अनेक मजूरही यात बाधित होत आहेत.

गिरणा, तापीसह वाळूचे पाणथे असणाऱ्या ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढल्याचा निष्कर्ष स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायतींनी काढला आहे. वेगवेगळ्या तालुक्यांत वाळू वाहतुकीची छुपी परवानगी, अधिकृत ठेके आणि वाळूमाफियांतर्फे होणारा बेसुमार उपसा यामुळे कोरोना संक्रमण वाढले आहे.

नदीपात्रात पालन नाही

नदीपात्रात उतरणारे वाहनांचे चालक, क्लीनर, वाळू भरणारे मजूर यांच्याकडून कुठलेच नियमांचे पालन होत नाही. प्रशासनाने मास्क, परस्पर अंतर पाळणे आणि सोबतच सॅनिटायझरचा वापर करण्याचे बंधन अधिकृत ठेकेदारांना घातले होते. मात्र, त्याचे कुठेच पालन होताना दिसत नाही. परिणामी संक्रमण वाढू लागले आहे. जिल्ह्यात १५ तालुक्यांपैकी जो तालुका नदीपात्राला लागून आहे तेथूनच संक्रमणाची सुरवात झाली आहे.

सामान्यांना ई-पास

सामान्य वाहनधारकांना जिल्ह्यांतर्गत वाहतुकीसाठीही पोलिस दलातर्फे ई-पासची सक्ती करण्यात आलेली आहे. त्यात सबळ करणांसह ॲन्टिजेन तपासणी करून त्याचा अर्ज करावा लागतो. मात्र, वाळू ठेक्यावरून सर्रास वाहने भरून परजिल्ह्यात वाळू पाठविली जात आहे.

घरात आणला..

गिरणानदी पात्राशेजारील बांभोरी, टाकरखेडा, उत्राण, धरणगाव-नारणा अशा ठेक्यांवर जवळपास दीड ते दोन हजार मजूर कामाला असतात. संबंधित ग्रामस्थांनी तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही. अनेकांच्या घरात कोरोना शिरला आहे. वाळू ठेक्याशी निगडित असणारे कुटुंबप्रमुख, मजूर किंवा ठेकेदाराकडे कार्यरत कामगारांनी आपापल्या घरात कोरोना आणल्याचे वाळू व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

मजुरांचीही ने-आण

गाड्या भरण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांच्या सोबतीला इतर गावांतील मजूरही ठेकेदाराकडून आणले जातात. एकाचीही ॲन्टिजेन टेस्ट करण्याची तसदी कोणी घेत नाही. परिणामी संक्रमित मजुरांकडूनच त्याचा फैलाव होत असल्याने ग्रामपंचायतींनी ठेकेबंदीचे पत्र जिल्‍हा प्रशासनाला दिले होते.

ग्रामपंचायतींवर दबाव

आव्हाणी ग्रामपंचायतीने संक्रमणाचे कारण ओळखत जिल्‍हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. त्यात गावातील ५० ते ६० लोक वाळू ठेक्यामुळे संक्रमित झाल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, काही ठेक्यांच्या तक्रारी झाल्यामुळे ते बंद झाले, तर मोठ्या वाळू ठेकेदारांनी ग्रामपंचायतीवरच राजकीय दबाव आणत ठेक्यावरील उत्खनन आणि वाहतूक बिनदिक्कत सुरू आहे. सोबतच गाव-खेड्यातील संक्रमणही वाढू लागले आहे.

loading image