चक्‍क संपुर्ण गाव झाले आकडेमुक्‍त

राजेश सोनवणे
Friday, 18 December 2020

रोहित्र बसवल्यानंतर त्यावरील भार तपासला असता अधिकृत जोडण्यांपेक्षा अधिक भार त्यावर आढळला. त्यानंतर सदर रोहित्रावर विजेचा अनधिकृत वापर होत असल्याचे निदर्शनास आले. 

जळगाव : रावेर तालुक्यातील पिंप्री गावात सिंगल फेजची रोहित्रे सतत नादुरुस्त होऊन वीजपुरवठा खंडित होत होता. महावितरणने येथील फॉल्‍ट शोधून सिंगल फेजऐवजी नवीन थ्री फेजचे रोहित्र बसविले. तसेच अनधिकृत वीजवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरवात केली. यामुळे संपुर्ण गाव आकडेमुक्त करण्यात आले. परिणामी गावकऱ्यांची खंडित वीजपुरवठ्याची समस्याही मिटली आहे.

महावितरणच्या केऱ्हाळे कक्षांतर्गत सातपुड्याच्या पायथ्याशी पिंप्री हे सुमारे १६०० लोकसंख्या असलेले गाव आहे. या गावात सतत वीजपुरवठा खंडित होत होता. येथील सिंगल फेजची तीन रोहित्रे १ एप्रिल २०१९ ते नोव्हेंबर २०२० पर्यंत १३ वेळा नादुरुस्त झाली. महावितरणच्या जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी समस्येचे मूळ शोधून त्या ठिकाणी सिंगल फेजऐवजी नवीन थ्री फेज १०० केव्हीएचे रोहित्र उपलब्ध करून दिले. रोहित्र बसवल्यानंतर त्यावरील भार तपासला असता अधिकृत जोडण्यांपेक्षा अधिक भार त्यावर आढळला. त्यानंतर सदर रोहित्रावर विजेचा अनधिकृत वापर होत असल्याचे निदर्शनास आले. 

धडक कारवाईत १२५ घरातून वायर जप्त
पिंप्री गावात गावकऱ्यांच्या विरोधामुळे वीजचोरी रोखण्यात अडथळे येत होते. मात्र मुख्य अभियंता कुमठेकर यांनी वीज चोरीविरुद्ध धडक मोहीम राबवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार १५ डिसेंबरला सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे, रावेरचे उपविभागीय अभियंता प्रभूचरण चौधरी, सहायक अभियंता श्रीकृष्ण बुरकुल, तुषार गाजरे, मोहंमद अवेस, योगेश पाटील, समीर तडवी, देवेंद्र महाजन, कनिष्ठ अभियंता मुकेश ठाकरे व सुमारे २० जनमित्रांनी पिंप्रीत वीजचोरांवर धडक कारवाई केली. वीजवाहिनीवर आकडे टाकून अनधिकृत वीजचोरी करणाऱ्या १२५ लोकांचे वायर जप्त करण्यात आले. यावेळी महावितरण कर्मचाऱ्यांकडून वायर हिसकावण्याचा व धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न लोकांनी केला. कर्मचाऱ्यांना घेराव घातला. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विरोध मोडीत काढला आणि न डगमगता कारवाई केली.  

अन्‌ अधिकृत वीज जोडणीला सुरवात
गावात अधिकृत वीजजोडणी करण्याची कार्यवाही त्वरित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांसोबत त्वरित बैठक घेऊन नवीन अधिकृत वीजजोडणीसाठी गावकऱ्यांना प्रोत्साहन दिले. गावात एरियल बंच केबल टाकण्याचे काम सुरू असून अधिकृत वीजजोडणी घेतल्याशिवाय यापुढे विजेचा वापर करताच येणार नाही. याची जाणीव करून दिली. गावात यापूर्वी एकूण १०६ वीजजोडण्या कायमस्वरूपी खंडित होत्या. सरपंचांनी गावात दवंडी देऊन अधिकृत जोडणी घेण्याचे आवाहन केले. गेल्या तीन दिवसांत कागदपत्रांची पूर्तता केलेल्या ७० अर्जदारांना त्वरित जोडणी दिली असून, उर्वरित ३७ जोडण्या देण्याचे काम प्रगतिपथावर आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news mahavitaran action pimpri village