esakal | चौकाचौकांत बॅरिकेड्‌स; पोलिसांचा मात्र पत्ताच नाही

बोलून बातमी शोधा

jalgaon lockdown
चौकाचौकांत बॅरिकेड्‌स; पोलिसांचा मात्र पत्ताच नाही
sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : सध्या लॉकडाउनचे निर्बंध आहेत. सकाळी अकरापर्यंत भाजीपाला, किराणा दुकानांवर गर्दी दिसते. अकरानंतर बाजारपेठ ‘लॉक’ असते, पण रस्त्यांवर फिरणाऱ्यांची कमी नसते. चौकात बॅरिकेड्स आहेत, पण पोलिस नाहीत. पोलिस आहेत, पण ते कुणाची साधी चौकशीही करत नाहीत, असे चित्र ‘सकाळ स्कॅनिंग’मधून दिसून आले.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १ मेपर्यंत लॉकडाउन जारी करण्यात आला. या कठोर निर्बंधात जीवनावश्‍यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी सात ते अकराची वेळ निश्‍चित केली असून, अकरानंतर कडक लॉकडाउन पाळणे अपेक्षित आहे. मात्र, ‘सकाळ’ने शहरातील स्थितीचा आढावा घेतला असता, ‘लॉकडाउन’ गांभीर्याने पाळला जात नसल्याचे दिसून आले.

सकाळी गर्दी कायम

भाजीपाला, दूध व किराणा घेण्यासाठी सरकारने सात ते अकरा या वेळेत मुभा दिली असली, तरी त्या वेळेत गर्दी होऊ नये, सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे आदी नियम आहेत. मात्र, ‘सकाळ’च्या चार तासांत बाजारात, दुकाने, भाजीपाला मार्केटमध्ये मोठी गर्दी होत असून, त्यावर प्रशासन, पोलिस दलाला नियंत्रण मिळविता आलेले नाही.

अकरानंतरही आवागमन सुरूच

अकरानंतर भाजीपाला किराणा दुकाने आदी सर्वच बंद होऊन केवळ हॉस्पिटल, मेडिकल, बँका व शासकीय कार्यालये आणि तीही १५ टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, असे असले, तरी अकरानंतरही रस्त्यावर लोकांचे आवागमन सुरू असते.

बॅरिकेड्‌स आहेत, पोलिस नाहीत

लॉकडाउन जारी झाला त्या वेळी पहिले चार-पाच दिवस चौकाचौकांत पोलिस तैनात राहायचे, ते येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना थांबवून चौकशीही करायचे. मात्र, नंतर हे चित्र बदलले. सध्या प्रमुख चौकांत बॅरिकेड्स आहेत, पण नागरिकांना थांबवून चौकशी करणारे पोलिस मात्र गायब झाले. काही चौकांमध्ये पोलिसही असतात, पण ते कुठेतरी चौकाच्या कोपऱ्यात गप्पा मारताना दिसतात.

हे चौक आहेत ‘बेवारस’

सद्य:स्थितीत शहरातील प्रमुख चौकांत पोलिस बंदोबस्ताचा पत्ता नाही. चित्रा चौक, पांडे डेअरी चौक, अजिंठा चौक, स्वातंत्र्य चौक, कोर्ट चौक, बहिणाबाई चौक, पुष्पलता बेंडाळे चौक आदी चौक बेवारस आहेत. पोलिस असले, तरी ते क्वचित प्रसंगीच दिसतात.

..तर काही गप्पांमध्ये दंग

आकाशवाणी चौकात पोलिस असतात. रात्री ते काही लोकांना थांबविताना दिसतात. काव्यरत्नावली चौकात तैनात पोलिस बंद पडलेल्या कारंजाजवळ गप्पा मारताना दिसतात. इतकेच नव्हे, तर पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरही पोलिसांचा पत्ता नसतो. असले तरी ते कोणतेही वाहन थांबविताना दिसत नाहीत आणि याच मार्गावरून दिवसभरात शेकडो वाहने बिनदिक्कतपणे वापरताना दिसतात.