
नाशिक येथील सीएमएस इन्फो सिस्टम लिमीटेड या कंपनीकडे चाळीसगाव रस्त्यावरील बँकांच्या एटीएम मशिनमध्ये रोकड भरण्याची जबाबदारी आहे. हे पैसे टाकण्यासाठी स्वतंत्र वाहन दिले जात असून, सोबत चार कर्मचारी असतात
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘एटीएम’ मशिनमध्ये पैसे टाकण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीच्या दोघा कर्मचाऱ्यांनी त्यांना दिलेला ‘पासवर्ड’ वापरून ‘एटीएम’मधील रकमेचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ज्यांच्यावर रोकड भरण्याची जबाबदारी होती, त्यांनीच पैसे हडप केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नाशिक येथील सीएमएस इन्फो सिस्टम लिमीटेड या कंपनीकडे चाळीसगाव रस्त्यावरील बँकांच्या एटीएम मशिनमध्ये रोकड भरण्याची जबाबदारी आहे. हे पैसे टाकण्यासाठी स्वतंत्र वाहन दिले जात असून, सोबत चार कर्मचारी असतात. मेहुणबारे, उंबरखेड, चाळीसगाव, कजगाव, भडगाव व पाचोरा या भागातील २२ एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी सचिन रामदास जाधव (रा. शास्त्रीनगर, गजाननवाडी, चाळीसगाव) व सागर समाधान पाटील (रा. पाचोरा) यांची नेमणूक केलेली आहे. या दोघांना पैसे भरण्यासाठीचे पासवर्ड कंपनीने दिलेले आहेत.
असा उघडकीस आला प्रकार
२२ डिसेंबरला मेहुणबारे येथील एटीएममध्ये या दोघांनी पाच लाख रुपये भरले. या एटीएममध्ये यापूर्वीचे पाच हजार ५०० रुपये होते. त्यानंतर दैनंदिन व्यवहार सुरू झाले. २४ डिसेंबरला कंपनीचे ऑडिटर प्रशांत साळवे व कर्मचारी सागर पाटील हे दोघे नेहमीच्या तपासणीनिमित्त एटीएमवर गेले असता, सागरचा पासवर्ड मशिनने घेतला नाही. हा प्रकार नाशिक कार्यालयात कळविल्यानंतर कंपनीचे इंजिनिअर नितीन पाटील हे आले. त्यांनी तांत्रिक अडचण लक्षात घेऊन एटीएमचा सुरक्षित दरवाजा तोडण्याचा निर्णय घेतला. हा दरवाजा तोडल्यानंतर एटीएममध्ये ३ लाख ३४ हजार ५०० रुपये नसल्याचे लक्षात आले. अधिक चौकशी नंतर एटीएमचा पासवर्ड (जो केवळ दोघा कर्मचाऱ्यांनाच माहीत होता) वापरून ही रक्कम काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, येथील पोलिसात असिस्टंट मॅनेजर असिफ अली मोहंमद शेख यांच्या तक्रारीवरून सचिन जाधव व सागर पाटील या दोघांविरोधात गैरव्यवहाराचा गुन्हा केला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
‘एटीएम’ ठरले ‘शो पीस’
ग्रामीण भागात ‘एटीएम’ची सुविधा सुरू झाल्याने बँकांच्या ग्राहकांची सोय झाली असली तरी बहुतांश ‘एटीएम’मध्ये पुरेशी रक्कम राहत नसल्याने हे ‘एटीएम’ सद्यःस्थितीत ‘शो पीस’ ठरले आहेत. बऱ्याच ‘एटीएम’वर सुरक्षारक्षक देखील नियुक्त नसतात. त्यामुळे ‘एटीएम’ फोडण्याचे प्रकार देखील काही ठिकाणी झाले आहेत. ऐन गरजेच्यावेळी ग्रामीण भागातील ग्राहकांना ‘एटीएम’मधून पैसे मिळत नाहीत. याबाबत संबंधित बँकांसह कंपनीने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
संपादन ः राजेश सोनवणे