esakal | विकेंड लॉकडाउनबाबत व्यापारी रस्त्यावर; मत छिनो हमारा कारोबार, हमारा भी है घरबार..केली घोषणाबाजी
sakal

बोलून बातमी शोधा

weekend lockdown

‘ब्रेक द चेन’ या शासनाच्या जटील नियमानंतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंदबाबत शासनाने काढलेले आदेश या नव्या निर्बधामुळे व्यापारी व कामगारात संभ्रमाचे वातावरण आहे.

विकेंड लॉकडाउनबाबत व्यापारी रस्त्यावर; मत छिनो हमारा कारोबार, हमारा भी है घरबार..केली घोषणाबाजी

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा (जळगाव) : राज्य सरकारच्या कठोर निर्णयामुळे तब्बल ३० एप्रिलपर्यत दुकाने बंद ठेवणे कोणालाच परवडणारे नाही. विकेंड लॉकडाउनच्या नावाखाली सुरु केलेले लॉकडाउन तात्काळ बंद करावे. अत्यावश्यक सेवा सुरु मात्र इतर दुकाने बंद याबाबत व्यापारी वर्गात संभ्रमता निर्माण झाली आहे. ‘मत छिनो हमारा कारोबार, हमारा भी है घरबार, लॉकडाऊन हटाओ, व्यापार बचाओ अशा घोषणा देत व्यापारी महासंघाने तहसिलदार, पोलिस निरीक्षक व मुख्याधिकारी यांना निवेदन दिले.
‘ब्रेक द चेन’ या शासनाच्या जटील नियमानंतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंदबाबत शासनाने काढलेले आदेश या नव्या निर्बधामुळे व्यापारी व कामगारात संभ्रमाचे वातावरण आहे. मालाच्या उत्पादनाला परवानगी; मात्र ते विकायला बंदी हा कुठला न्याय असा सवाल व्यापारी यांनी करुन रस्त्यावर उतरत काळ्या फित लावुन शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रिय, उपाध्यक्ष अशोक लालवाणी, सचिव संजय कासार, प्रतिक मराठे, धनंजय मराठे, गोपाल दाणेज, धर्मेंद्र हिंदुजा, रोशन शहा यांचेसह कामगार यांनी महामार्गावर घोषणा देत तहसिलदार अनिल गवांदे, पोलिस निरीक्षक संतोष भंडारे व पालिकेत कार्यालयीन अधिक्षक संगमित्रा संदानशिव यांना निवेदन दिले. 


शासनाने निर्णयाबाबत फेरविचार करावा
कोरोनाच्या पहिल्या लाटेत शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करित तीन महिने टाळेबंदीत सहकार्य केले. यासह सामाजिक बांधिलकी जोपासणेकामी अग्रेसर राहिलो. आता पुन्हा २५ दिवस व्यवसाय बंद झाला, तर अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. अनेक व्यथा आज व्यापाऱ्यांवर येवुन ठेपल्या आहेत. कामगारांचे हजारो कुटुंब यावर अवलंबुन आहेत. यासाठी शासनाने नियमांबाबत शिथिलता आणावी. नियमांचे पालन करुन व्यापारी बांधव व्यवसाय करु. आता पुन्हा व्यवसाय बंद झाला सर्व आर्थिक घडी विस्कटली जाईल. कामगारांचे वेतन, बँकाचे हप्ते व दुकान भाडे अशा अनेक समस्या निर्माण होतील. याबाबत शासनाने नियमांचा फेरविचार करुन दुकाने उघडणेबाबत मुभा द्यावी; अशी अपेक्षा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रिय यांनी ‘सकाळ’शी बोलतांना व्यक्त केली आहे.

संपादन- राजेश सोनवणे

loading image