esakal | चहा- नाश्ता घेतला अन्‌ लगेच ओढावला मृत्यू

बोलून बातमी शोधा

patient death
चहा- नाश्ता घेतला अन्‌ लगेच ओढावला मृत्यू
sakal_logo
By
टिम इ सकाळ

जळगाव : शिरसोली (ता. जळगाव) येथील रहिवासी असलेल्या ५५ वर्षीय रुग्णाचा शनिवारी (ता. २४) उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. मृताच्या नातेवाइकांनी रुग्णालयाने औषधोपचार व्यवस्थित न केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत गोंधळ घातला व मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चावदास ताडे असे मृताचे नाव आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बीएसएनएल कार्यालयासमोरील गजानन हार्ट हॉस्पिटल येथे शिरसोली प्र. न. येथील चावदस ताडे यांना दाखल करण्यात आले होते. ११ एप्रिलला त्यांना हृदयाचा त्रास जाणवत असल्याने जळगावातील आशीर्वाद हॉस्पिटल येथे व्हेंटिलेटरवर ठेवले होते. मात्र त्यांची तब्येत आणखी खालावल्याने आणि त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाल्याने त्यांना गजानन हार्ट हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते. त्यांची कोरोना चाचणीदेखील निगेटिव्ह आली होती.

चुकीचा औषधोपचार केल्‍याचा आरोप

नेहमीप्रमाणे दाखल रुग्णाने सकाळी साडेनऊला चहा- नाश्‍ता घेतला. मात्र यानंतर काही वेळाने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताचे लहान बंधू आणि शिरसोली प्र. न. चे उपसरपंच श्रावण ताडे यांनी केला. तर चुकीचा औषधोपचार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या आरोपाने मृताचे नातेवाईक आणि हॉस्पिटल प्रशासन यांच्यात वाद झाल्याने बराचवेळ गोंधळाचे वातावरण होते.

रक्ताच्या गाठी झाल्याने मृत्यू

घटनेप्रकरणी हॉस्पिटलचे संचालक डॉ. विवेक चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता चावदस ताडे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. तसेच त्यांची ऑक्सिजन पातळी चांगली होती, त्यांची तब्येत चांगली होती. मात्र अचानक त्यांच्या रक्तात आणि मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण झाल्याने हृदयक्रिया बंद पडल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.