भाजपच्‍या वेबसाईटवर आक्षेपार्ह मजकूर.. रक्षा खडसेंची पहिली प्रतिक्रिया 

राजेश सोनवणे
Thursday, 28 January 2021

भाजपाच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत माहिती मिळाली. व्हाट्सअ‌ॅपवर याबाबत जे काही स्क्रिनशॉट आलेत.

जळगाव : भाजपच्या संकेतस्थळावरील प्रकाराबाबतची माहिती काल सायंकाळी मिळाली. त्यानंतर स्वतः पोलीस अधिक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली. सदर प्रकरणी चौकशी सुरू असून हा प्रकार भाजपकडून घडलेला नाही. चौकशीत याबाबतचे सत्‍य समोर येईल; अशी प्रतिक्रिया रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी बोलताना दिली. 

भाजपाच्या संकेतस्थळावर लोकसभा सदस्यांच्या यादीत माझ्या नावाखाली आक्षेपार्ह शब्दप्रयोग असल्याबाबत माहिती मिळाली. व्हाट्सअ‌ॅपवर याबाबत जे काही स्क्रिनशॉट आलेत. त्यात हा प्रकार 'सेव्ह महाराष्ट्र फ्रॉम बीजेपी' म्हणून असलेल्या पेजवरून व्हायरल झाल्याचे दिसते आहे. हे पेज कोण चालवतो, त्याची मला माहिती नाही. त्यानंतर या प्रकाराबाबत तत्काळ पोलीस अधीक्षक आणि पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा केली. हा प्रकार भाजपाकडून झालेला नाही. 

एडीटींग झाल्‍याचा संशय
सदर प्रकार समजल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहणी केली. यात कोणत्याही प्रकारची गडबड आढळून आली नाही. त्यामुळे कुणीतरी भाजपच्या संकेतस्थळाचे स्क्रिनशॉट काढून त्यावर एडिटिंग करून हा प्रकार केल्याचा संशय आहे. आता या प्रकरणाची चौकशी सुरू असून, या चौकशीत त्यात सारा प्रकार समोर येईलच, असा विश्वास त्यांनी व्यक्‍त केला.

व्हायरल करणे चुकीचे
कोणत्‍याही महिलेच्या बाबतीत असा प्रकार घडल्यानंतर त्‍यास सोशल मिडीयावर व्हायरल करणे चुकीचे आहे. खासदार म्‍हणून राज्‍यात नाही देशभरात याबाबत चर्चा होवू शकते. अशा गोष्टीला सत्ताधारी असो किंवा विरोधक, त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल करणे चुकीचे आहे. या साऱ्या प्रकाराबाबत दुःख वाटत असून, याची सत्‍यता चौकशीत समोर येणार असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news mp raksha khadse bjp website