विड्याचे पान शुभ कार्यात का आहे महत्वाचे; अन्‌ आरोग्‍यदायी फायदे  

राजेश सोनवणे
Wednesday, 27 January 2021

कोणतेही शुभ कार्य असो सर्वात प्रथम विड्याच्या पान सांगितले जाते. पूजा, लग्न, साखरपुडा किंवा अन्य कोणतेही शुभकार्य असेल तर अनेकदा ब्राह्मणाकडून विड्याचे पानं आणा असे सांगितले जाते. मात्र हे विड्याचे पान का वापरले जाते असे विचारले तर कोणीही याचे कारण सांगू शकणार नाही. 

जळगाव : विड्याच्या पानाला केवळ महाराष्ट्रीय लोकांमध्येही नाही तर इतर धर्मांतील लोकांमध्ये देखील महत्व आहे. बंगाली लोकांमध्ये लग्नामध्ये वधूच्या तोंडासमोर विड्याचे घेऊन मंडपात आणले जाते; तर तेलुगु, बिहारी, पंजाबी यांच्यात विड्याचे पान आणि सुपारी देऊन लग्नाची बोलणी करतात किंवा शुभकार्याला सुरुवात करतात. 

धार्मिक कथेत असा आहे उल्‍लेख
विड्याच्या पानाचा धार्मिक कथेत असलेल्‍या उल्‍लेखानुसार समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताचे वाटप केले. त्यात शिल्‍लक राहिलेले अमृत मोहिनीने जवळ उभ्या असलेल्या नागराज नावांच्या हत्तींच्या खुंटाजवळ नेऊन ठेवले. थोड्या दिवसांनी त्या अमृतामधून वेल उगवली. ही वेल नागाप्रमाणे खुंतावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली. हिरवीगार पाने असलेली वेल पाहून देवांनी त्या वेलीला नागवेल म्हणून संबोधित केले. भोजन झाल्यावर देव देवता या पानाचा विडा खाऊ लागले. त्यानंतर देवाला महानैवैद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा, दक्षिणा ठेवण्यात येऊ लागली. 

विड्याच्या पानाचे महत्व 
विड्याच्या पानाच्या टोकास "लक्ष्मी"चा सहवास, पानाच्या उजव्या बाजूस "ब्रम्हदेवांचा" सहवास, मधोमध "सरस्वती देवीचा" वास, डाव्या बाजूस "पार्वतीदेवीचा" वास, पानाच्या लहान देठामध्ये "महाविष्णूचा" वास, मागील बाजूस "चंद्रदेवते"चा वास, सर्व कोपऱ्यामध्ये "परमेश्वरा"चा वास, पाना खाली "मृत्यूदेवते"चा वास असल्‍याचे सांगितले जाते. या कारणाने ताम्बूल सेवन करताना बुडाचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे.

पान खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे
जेवणानंतर पान खाणं ही प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. आयुर्वेदातही पान खाण्याचे फायदे नमुद करण्यात आले आहेत. अगदी आजीबाईच्या बटव्यातही या पानांचा आवर्जुन समावेश करण्यात येतो. या पानांची मुळ चव ही तिखट स्वरूपात असते, परंतु यामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, खनिजे, कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. हे पान तयार करण्याचीही एक वेगळी पद्धत असते. या पानामध्ये गुलकंद, वेलची, सुपारी, कात, चुना यांसारखे अनेक मसाले टाकले जातात. त्याचप्रमाणे पानामध्ये टाकण्यात येणाऱ्या मसाल्यांनुसार त्यांना वेगवेगळी नावंही आहेत. याचे आरोग्‍यदायी फायदे म्‍हटले तर पोटाच्या समस्या दूर होतात. पान खाल्याने पचन क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. तसेच तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी याचा उपयोग हेात असतो. नागवेलीच्या पानांमध्ये असलेले गुणकारी तत्व शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया कमी करण्याचे काम करतात. ज्या लोकांच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल त्यानी पान खाणं फायदेशीर ठरते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news nagvel important in good deeds and health