राष्‍ट्रीय बाल स्‍वास्‍थची 'वाहन सेवा' थांबली 

देवीदास वाणी
Monday, 28 December 2020

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमानुसार जिल्हा रुग्णालय जळगाव अंतर्गत एकूण ४६ आरबीएसके पथके कार्यरत आहेत. ४६ पैकी ४५ पथकांना वाहने पुरविण्यात आलेली आहे.

जळगाव : जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत पुरविण्यात येणारी ४५ वाहनांची 'वाहन सेवा' गेल्या पंधरा दिवसांपासून अचानक थांबल्याने जिल्ह्यातील अंगणवाडी व शालेय आरोग्य तपासणीचे कामकाज पूर्णतः बंद पडल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. या प्रकरणी कंत्राटदार संस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा संस्था मर्यादित नाशिक यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांनी २२ डिसेंबरला पत्र काढून सेवा सुरु करण्याबाबत निर्देश दिले व अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे. 

जिल्ह्यातील ४६ पथकांचे काम थांबले 
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमानुसार जिल्हा रुग्णालय जळगाव अंतर्गत एकूण ४६ आरबीएसके पथके कार्यरत आहेत. ४६ पैकी ४५ पथकांना वाहने पुरविण्यात आलेली आहे. सदर वाहने ही १४ डिसेंबरपासून उपलब्ध झालेली नाही. यामुळे आरोग्य तपासणी करणेस अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील ४६ पथकांचे काम थांबले आहे. 

जिल्हा शल्यचिकित्सकांनी काढले पत्र 
कुठलीही पूर्वसूचना न देता जिल्ह्यातील ४५ वाहनांची सेवा खंडित केली; यामुळे राष्ट्रीय कार्यात अडथळा निर्माण झाल्याचा ठपका जिल्हा शल्यचिकित्सक यांनी ठेवत कंत्राटदार संस्था श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवाभावी संस्था मर्या. नाशिक यांना पत्र काढले. पत्रात अंगणवाडी व इयत्ता ९ ते १२ पर्यंत शाळा सुरु झालेली आहे. सदर अंगणवाडी व शाळा आरोग्य तपासणी करणे तसेच कोविड कामकाजाकरिता वाहनांची आवश्यकता आहे. वाहने बंद असल्याने आरोग्य तपासणी करण्यास अडचणी येत आहे. यामुळे राष्ट्रीय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे तात्काळ वाहने सुरु करुन तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा असे म्हटले आहे. 

काय आहे योजना.. 
राज्‍यातील सर्व जिल्‍हयांत राष्‍ट्रीय बाल स्‍वास्‍थ कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमात ० ते १८ वयोगटातील मुलांची आरोग्‍य तपासणी करण्‍यासाठी राज्‍यात १ हजार १३० पथके कार्यरत आहेत. प्रत्‍येक पथकात २ वैद्यकीय अधिकारी (१ पुरुष व १ स्त्री), १ आरोग्‍य सेविका व १ औषध निर्माता यांचा समावेश आहे. तालुकास्‍तरावरील ग्रामीण/ उपजिल्‍हा रुग्‍णालये येथे या पथकांचे मुख्‍यालय करण्‍यात आले आहे. सध्‍या या पथकांद्वारे ग्रामीण व शहरी भागातील अंगणवाडीतील बालकांची व शालेय विदयार्थ्‍याची आरोग्‍य तपासणी करण्‍यात येत आहे. या पथकांना मुलांची तपासणी करण्‍यासाठी आवश्‍यक ती वैद्यकीय उपकरणे व औषधे यांची किट देण्‍यात आलेली आहे. पथकामार्फत तपासणी केल्‍यानंतर विद्यार्थ्‍यांना संदर्भसेवा ग्रामीण/ उपजिल्‍हा रुग्‍णालये व जिल्‍हा रुग्‍णालये येथे दिल्‍या जातात. या पथकांना फिरण्यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत 'वाहन सेवा' पुरविण्यात येते. यामुळे खेडोपाडी जाऊन आरोग्य तपासण्या करण्यास मदत होते. 
 
कंत्राटदार संस्थेवर कारवाई अपेक्षित 
अत्यावश्यक असणारी सेवा 'वाहन सेवा' अचानक पूर्वसूचना न देता बंद झाल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली असून कोरोनासारख्या महामारीत वाहन सेवा बंद केल्याने कंत्राटदार संस्थेने शासनासोबत केलेला करार भंग केला असून अशा संस्थांवर 'काळ्या यादीत' टाकण्याची कारवाई होणे अपेक्षित आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news national child health mission vehicle service stop