esakal | पारोळा बाजार समिती उभारणार शंभर बेडचे कोविड रुग्णालय

बोलून बातमी शोधा

covid center
पारोळा बाजार समिती उभारणार शंभर बेडचे कोविड रुग्णालय
sakal_logo
By
टिम इ सकाळ

पारोळा (जळगाव) : कोरोना व्हायरसचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. याकरीता कोविड सेंटरची उभारणी देखील करण्यात येत आहे. याच अनुषंगाने एरंडोल व पारोळा तालुका परिसरात वाढणाऱ्या रूग्‍णांकरीता पारोळा बाजार समिती शंभर बेडचे कोविड रूग्‍णालय उभारण्यात येणार आहे.

एरंडोल व पारोळा तालुक्यासह जिल्हाभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कुटीर रुग्णालयात ऑक्सिजन बेड कमी असल्यामुळे रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे. तसेच रुग्णालयात बेडच्या कमतरतेमुळे रुग्णांची खासगी रुग्णालयात मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे.

२५ ऑक्‍सीजन बेड

पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीने रुग्णांच्या हाल होऊ नयेत, यासाठी समितीच्या आवारातील हरिनाथ मंगल कार्यालय येथे ऑक्सिजनचे २५ बेड तर विना ऑक्सिजनचे ७५ बेड असे एकूण शंभर बेडचे सुसज्ज रुग्णालय संस्थेच्या स्वखर्चाने सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती अमोल चिमणराव पाटील यांनी दिली.

जिल्‍हाधिकारींकडे मागणी

सभापती श्री. पाटील म्हणाले, की हे कोविड सेंटर कुटीर रुग्णालयांतर्गत ठेऊन वैद्यकीय सेवेसाठी शासकीय यंत्रणेचे डॉक्टर व वैद्यकीय सेवेचे कर्मचारी शासनाकडून मिळावे, अशी विनंती देखील त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा उपनिबंधक, जळगाव व आमदार चिमणराव पाटील यांना पत्र व्यवहार केलेला आहे. तालुक्यात ग्रामीण रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीकडून कोरोना सेंटर उभारण्याचा मानस सभापती अमोल पाटील यांनी व्यक्त केला आहे. यामुळे पारोळा तालुक्यात रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच रुग्णांची होणारी आर्थिक पिळवणूक यामुळे थांबणार आहे.