महिना उलटूनही कापसाची रक्कम मिळेना 

संजय पाटील
Monday, 28 December 2020

शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यास कापूस न देता जिनिंगमध्ये कापसाची मोजणी केली. मात्र, महिना उलटूनही रक्कम खात्यात जमा होत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, याबाबत लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

पारोळा (जळगाव) : कापसाला चांगला भाव मिळावा, यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पणन विभागांतर्गत असलेल्या जिनिंगमध्ये कापूस मोजणी केली. परंतु एक महिना उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यात कापसाची रक्कम न मिळाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी ‘पणन’च्या कासवगतीच्या प्रकियेबाबत नाराजी व्यक्त केली. रक्कम तत्काळ न मिळाल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. ‘पणन’अंतर्गत २८ नोव्हेंबरपासून ‘ओम नमो शिवाय’, ‘बालाजी कोटेक्स’ व दळवेल येथील जिनिंगमध्ये तालुक्यातील कापूस मोजणीस सुरवात झाली. शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यास कापूस न देता जिनिंगमध्ये कापसाची मोजणी केली. मात्र, महिना उलटूनही रक्कम खात्यात जमा होत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, याबाबत लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
कापसाला शासन चांगला भाव देईल, या आशेने शेतकरी दर वर्षी शेतात कापसाचे विक्रमी उत्पन्न घेतात. उत्पादित झालेला कापूस विक्रीसाठी जिनिंगमध्ये आणला जातो. मात्र, शेवटी कापसाची रक्कम मिळविताना अनेक अडचणींना त्याला सामोरे जावे लागत असल्यामुळे नैराश्यापोटी तो खासगी व्यापाऱ्याकडे कापूस देऊन मोकळा होत होता. 

खासगी व्यापाऱ्यांकडे कल 
सरकारचे राजकारण, प्रशासनाचे प्रश्न व कर्मचाऱ्यांच्या मनुष्यबळाच्या समस्या. त्यात तोलाई, मापाडी, वाहतूक, कट्टी व लुटूपटूची देवाणघेवाण व शेवटी रक्कम घेताना होणार विलंब या त्रासाला कंटाळून शेवटी कमी दरात का असेना खासगी व्यापाऱ्याकडे काट्याखाली पैसे मिळत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना देत समाधान मानले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना कापसाची रक्कम लवकर न मिळाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

अशी आहे प्रक्रिया 
रक्कम जमा करण्यापूर्वी शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, बँकेचे नाव, आयएफएसी कोड यांचे बारीक निरीक्षण करून यादी जळगाव येथे पाठविली जाते. याबाबत जळगावला तपासणी करून प्रादेशिक कार्यालय, औरंगाबाद येथे सर्व याद्या संकलित करून निधी जसा जमा होईल, तसा तत्काळ बँकेत ती रक्कम जमा होऊन नंतर सर्व शेतकऱ्यांना त्याच्या खात्यानुसार वितरित केली जात असते. या सर्व प्रकियेस वेळ लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना रक्कम देताना उशीर होत असल्याचे सांगण्यात आले. 

जानेवारीपर्यंत पैसे खात्यात? 
शासकीय कापूस खरेदी करताना शासन याबाबत निधी उभारून तो शेतकऱ्यांना दिला जातो. त्यामुळे जानेवारीत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news parola farmer no payment cotton in last one month