पारोळा नगरपालिकेत भाजप- सेनेत चुरस; शविआ झाले बाजूला

संजय पाटील
Tuesday, 5 January 2021

सदर निवड ही पक्षाच्या संख्या बळावर होणार असताना शहर विकास आघाडीकडून कोणतेही नाम निर्देशन पत्र दाखल केले गेले नसल्याने सर्व समित्यांवर सेना- भाजपची पकड राहणार हे निश्चित झाले.

पारोळा (जळगाव) : पारोळा नगरपालिकेकडून विविध समित्या निवडीसाठी प्रकिया राबविण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात सेना आणि भाजपच्या सदस्‍यांकडून प्रस्‍ताव सादर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अनिल गवांदे तर सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी ज्योती भगत होत्या. 
पारोळा नगरपालिकेच्या विविध समिती निवडीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली गेली. यामध्ये भाजप गटनेते बापू महाजन यांनी आपल्या गटातून नियोजन व विकास समितीसाठी मोनाली पाटील व प्रदीप पाटील तर सेना गटनेते दीपक अनुष्ठान यांनी सेनेतर्फे त्यांचे नाव दिले. तर सार्वजनिक बांधकाम समितीसाठी भाजपकडून रेखा चौधरी, अलका महाजन तर सेनेकडून मंगेश तांबे, पाणी पुरवठा समितीसाठी भाजपकडून बापू महाजन, जयश्री बडगुजर सेनेकडून वैशाली पाटील यांनी अर्ज दाखल केला. तसेच आरोग्य समितीसाठी भाजपकडून नवल सोनवणे, बापू महाजन तर सेनेकडून छाया पाटील, महिला बाल कल्याण समितीसाठी भाजपकडून अंजली पवार, मोनाली पाटील तर सेनेकडून वर्षा पाटील यांचे प्रस्ताव दोन्ही पक्षाच्या गटनेत्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. 

‘शविआ’चा अर्ज नाही
सदर निवड ही पक्षाच्या संख्या बळावर होणार असताना शहर विकास आघाडीकडून कोणतेही नाम निर्देशन पत्र दाखल केले गेले नसल्याने सर्व समित्यांवर सेना- भाजपची पकड राहणार हे निश्चित झाले. सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केले जातील; असे निवडणुक निर्णय अधिकारी अनिल गवांदे यांनी सांगितले. यावेळी कार्यालयीन अधीक्षक संघमित्रा संदानशिव, सभा लिपीक सुभाष थोरात उपस्थित होते. 

ऑनलाईनबाबत नाराजी
दरम्यान यावेळी पंचायत समित्यांच्या मासिक बैठका या सभागृहात घेतल्या जातात. परंतु नगरपालिका बैठका अजूनही व्ही. सी. ने का घेता? असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित करत ऑनलाईन बैठकीबाबत नाराजी व्यक्त केली.

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news parola nagar palika cameeti member selection