ईडीची नोटीस म्‍हणजे राजकीय हत्‍यार : आमदार रोहित पवार

प्रा. सी. एन. चौधरी
Sunday, 24 January 2021

राजकारणात आल्यावर केस पांढरे झाले आहेत. जनतेचे प्रश्न सोडवित असताना स्वतःच्या विचार न करता जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य द्यावे लागते. त्याला वेळ द्यावा लागतो हे करत असताना अनेक वेळा तणावाला सामोरे जावे लागते.

कजगाव (ता. भडगाव) : ईडीची नोटीस कोणत्याही भाजपच्या नेत्याला अजूनपर्यंत आलेली नाही. आली ती केवळ अन्य पक्षातील लोकांना म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनाच आली आहे. या सर्वांचा अभ्यास केला तर वाटते की केंद्र सरकार ईडीचा वापर राजकीय हत्‍यार म्‍हणून करत असल्‍याचे रोहित पवार पत्रकारांशी संवाद साधताना म्‍हणाले.
राष्‍ट्रवादीचे युवा आमदार रोहीत पवार आज जळगाव जिल्‍हात आले असताना कजगाव (ता. भडगाव) येथील खासगी मल्टीस्पेशालिटी रूग्‍णालयाचे उद्‌घाटन आमदार पवार यांच्या हस्ते झाले; यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी जि. प. सदस्य मंगेश पाटील, सरपंच दिनेश पाटील व कार्यकर्त्यांनी आमदार पवार यांचा सत्कार केला. यानंतर डॉ. भुषण मगर, डॉ. सागर गरुड, उद्योजक नितीन धाडीवाल उपस्‍थित होते. 

राजकारणात आल्‍यापासून केस पांढरे
राजकारणात आल्यावर केस पांढरे झाले आहेत. जनतेचे प्रश्न सोडवित असताना स्वतःच्या विचार न करता जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य द्यावे लागते. त्याला वेळ द्यावा लागतो हे करत असताना अनेक वेळा तणावाला सामोरे जावे लागते. सध्याचे राजकारण सोपे राहीले नसून आता राजकारणात ताणतणाव पाहायला मिळत आहे, त्यामुळे केस पांढरे झाले असल्‍याचे आमदार रोहित पवार म्‍हणाले.

राष्ट्रवादीच्या पदाधिकारी ना बुस्टर
आमदार रोहीत पवार यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी सांगताना जळगाव जिल्ह्यातील राजकारणाची पध्दत बदलली आहे. आपली ताकत असताना विरोधकांकडून वेगळी (पैसै?) ताकत लावली जाते. परंतु ती ताकत फक्त निवडणूक पुरता असते. नंतर कोणी किंमत देत नाही. म्हणून माणसांची, व्यक्तीची, विचारांची ताकत त्यापेक्षा मोठी असते. म्हणून विचारांची ताकत ठेवा; तसेच निवडणूक पुरता जर कोणी आपला वापर करीत असेल त्यांच्या विरोधात आवाज उठविला पाहिजे असे आवाहन आमदार पवार यांनी केले.

प्रेमाचा थेंब जपून ठेवेल
आमदार पवार म्हणाले, की समाजकारणामध्ये आल्यानंतर तुमच्यासारख्यांचे प्रेम पवार साहेब, दादा व माझ्या कुटूंबावर असेल त्याचेच काही प्रेमाचे शिंतोडे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर तुमच्यासारख्या माध्यमातून पडत असेल; तर प्रत्येक प्रेमाचा थेंब माझ्याकडे जपुन ठेवेल. त्याचा शेवटपर्यंत त्या प्रेमाचे मान ठेवत मला जेवढे करता येईल तेवढे मी करेन असे आश्वासन प्रसंगी दिले 

डॉक्टरांचे कौतुक पण अन् खंत
डॉक्टरांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. परंतु काही ठराविक डॉक्टरांनी सामान्य रूग्णांना लुटले. डॉक्टर जेव्हा होतो तेव्हा शपथ घेतात. काही झालं तरी लोकांची सेवा घडावी, लोकांना अडचण झाली तर सहकार्याची भावना असावी. परंतु काही लोकांना पैसे प्रिय असतात अशी खंत व्यक्त केली. तसेच युवकांनी आपल्या परिसरातील डॉक्टर, डेअरी व्यावसायिक, कॉटन मालक, मील चालक, शेतकरी, युवा शेतकरी, छोटे- मोठे उद्योग क्षेत्रातील लोकांकडून प्रेरणा घ्यावी. त्यांची शिकवण घेऊन आपल्या जिवनात आत्मसात आणावी व आपल्याला त्‍या कशा लागू करता येतील; यासाठी तरुणांनी प्रयत्न केला पाहिजे असे मत आमदार रोहीत पवार यांनी केले

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news political news pachora ncp mla rohit pawar statement ed notice