esakal | गुलाबराव पाटील आतापर्यंतचे निष्क्रिय पालकमंत्री

बोलून बातमी शोधा

gulabrao patil
गुलाबराव पाटील आतापर्यंतचे निष्क्रिय पालकमंत्री
sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव : जिल्ह्यात रेमडेसिव्हिर, कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा आहे. रेमडेसिव्हिरअभावी रुग्णांना प्राण गमवावे लागत आहेत. दुसरीकडे हजार रुपयांचे इंजेक्शन २५ हजारांत ब्लॅकने घ्यावे लागतेय. रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळेनासे झाले. कोरोना प्रतिबंधक लसींचाही पुरेसा पुरवठा नाही. अशा स्थितीत बैठकांपुरते येणारे पालकमंत्री ‘ॲक्शन मोड’मध्ये कुठेच दिसत नाहीत. माजी पालकमंत्री विविध आघाड्यांवर लढत असताना गुलाबराव पाटील नेमके कुठे आहेत, असा प्रश्‍न पडत असून, नागरिकांच्या त्याबद्दल तीव्र भावना आहेत.

पालकमंत्री म्हणून आघाडी सरकारच्या काळात गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील व फडणवीस सरकारच्या काळात एकनाथ खडसे, गिरीश महाजन यांनी काम केले. त्यांचा दरारा असा होता, की जळगावमधून फोन गेला की मुंबईत काम झाले म्हणून समजा. सध्याच्या काळात तर नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्‍न आहे. रेमडेसिव्हिर, ऑक्सिजन, कोरोनाच्या लसी या महत्त्वाच्या बाबी आहेत. त्याचा पुरेसा प्रमाणात जिल्ह्याला पुरवठा होणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्र्यांनी ठोस भूमिका घेणे, आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असल्याने वजन वापरून जिल्ह्याच्या पारड्यात अधिक कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

काहीच प्रयत्न नाहीत

मात्र पालकमंत्र्यांनी जर मागणीच केली नाही तर मुख्यमंत्रीही काय करणार? नाशिकला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रेमडेसिव्हिर, लसी, ऑक्सिजन मिळण्याबाबत विनंती केली. लागलीच त्या बाबींचा पुरेसा पुरवठा झाला. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पाटील यांनी शासनाकडे वरील गोष्टींसाठी काय पाठपुरावा केला? आणि त्या बाबी उपलब्ध का झाल्या नाहीत हे सांगावे. केवळ जिल्हा प्रशासनाने केलेल्या कामांचे श्रेय आपल्याला मिळावे म्हणून ती कामे आम्ही केली, बैठका घेणे कितपत योग्य आहे, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

मागील वर्षी कोरोनाकाळात मंजूर झालेली विजेची कामे आता जनतेसमोर आणून कोणता हेतू साध्य केला जात आहे? सध्याच्या स्थितीत कोरोनाकाळात कोणती ठोस कामे पालकमंत्री म्हणून केली, याबाबत प्रश्‍न उपस्थित होत आहे. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील धरणगावसह इतर गावांत पाणीटंचाईची समस्या आहे. त्यांच्या मतदारसंघातील पाण्याची समस्याही ते सोडवू शकले नाहीत. पाटलांच्या या निष्क्रियतेमुळे त्यांची तुलना माजी पालकमंत्र्यांशी होऊ लागली असून, खानदेशची मुलूखमैदान तोफ निष्क्रिय ठरत असल्याची टीकाही होत आहे.

देवकरांची कामगिरीही सरस

गुलाबराव देवकर पालकमंत्री असताना कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला, त्यातून हे काम सुरू झाले. खानदेशातील नाट्यप्रेमींसाठी मोठे वातानुकूलित नाट्यगृह असावे यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. यामुळे आज छत्रपती संभाजी महाराज वातानुकूलित नाट्यगृह उभे राहिले आहे.

खडसेंचीही भरीव कामगिरी

युती शासनाच्या काळात पाटबंधारेमंत्री असताना एकनाथ खडसेंनी केलेल्या कामाचा आजही उल्लेख होतो. फडणवीस सरकारमध्येही ते अवघे दीड वर्ष मंत्री व पालकमंत्रीही होते. त्या अल्पकाळात त्यांनी अल्पसंख्याकांसाठी शासकीय तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, कृषी विद्यापीठ, उद्यानविद्या महाविद्यालय, लिंबूवर्गीय संशोधन केंद्र यासह विविध विकासकामे मंजूर करून आणली.

जिल्ह्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शन, कोरोना प्रतिबंधक लसींचा प्रचंड तुटवडा आहे. लोकांच्या स्वॅबचा रिपोर्ट उशिरा येतो. आरेाग्याचा बिकट प्रश्‍न निर्माण झालाय. नागरिक औषधांअभावी मरताहेत. भयावह चित्र आहे. पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील काय करताहेत? त्यांच्या आवाक्यातील हे काम नाही. नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी पालकमंत्र्यांनी मुंबईत जोर लावावा. गिरीश महाजन बंगालला गेले, तिकडे गेले हे पाहण्यापेक्षा जिल्ह्यातील लोकांचे प्राण वाचविण्यासाठी काम करावे.

- गिरीश महाजन, आमदार

संपादन- राजेश सोनवणे