पॅसेंजर बंद; चाळीसगाव, भुसावळच्या चाकरमान्यांचे हाल 

देवीदास वाणी
Sunday, 27 December 2020

कोरोना काळात प्रवासी सेवा बंद केली, अनलॉकनंतर हळूहळू रेल्वेची प्रवासी सेवा रुळावर येत आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या नियमांचे पालन करून काही विशेष गाड्या सुरू केल्या. मात्र त्याचा म्हणावा तसा फायदा जिल्हावासीयांना होत नाही.

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या केवळ विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. पॅसेंजर बंद असल्याने गरीब रेल्वे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. रेल्वेगाड्या बंद असल्याने चाकरमाने आता एसटीचा आधार घेत आहेत. मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ येथून जळगावला येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक आहे. 
कोरोना काळात प्रवासी सेवा बंद केली, अनलॉकनंतर हळूहळू रेल्वेची प्रवासी सेवा रुळावर येत आहे. रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या नियमांचे पालन करून काही विशेष गाड्या सुरू केल्या. मात्र त्याचा म्हणावा तसा फायदा जिल्हावासीयांना होत नाही. कारण दिल्ली, बेंगळुरू, हैदराबादहून येणाऱ्या सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल झाल्याने जळगाव शहर व जिल्ह्यातील प्रवाशांचे तिकीट वेटिंगवरच असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची परिस्थिती सुधारली असून, जळगावकरांच्या हक्काची नाशिक-भुसावळ शटल, पुणे-भुसावळ हुतात्मा, मुंबई-भुसावळ पॅसेंजर, भुसावळ-सुरत पॅसेंजर या गाड्या अद्यापही बंदच आहेत. या गाड्या त्वरित सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे. 

गरीब प्रवाशांची होतेय फरफट 
जळगाव जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, रावेर येथून नोकरी व शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. याशिवाय लग्नसमारंभ, पर्यटन व इतर कार्यक्रमासाठी बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्याही वाढत असताना बंद पॅसेंजर व एक्स्प्रेस गाड्यांमुळे जळगाव जिल्हात मोठी निराशा होत आहे. परिणामी एसटी व खासगी वाहनांचा जळगावकरांना आधार घ्यावा लागत आहे. 

लोकल सुरू करा 
रेल्वेत प्रवाशांना तिकीट कन्फर्म असल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. सोबतच ज्यांचे सर्वसाधारण श्रेणीचे (जनरल) तिकीट रेल्वेतर्फे दिले जात नाही. मासिक पासही रेल्वेत नाकारले जाऊन दंड आकारला जातो. यामुळे रेल्वे सुरू असूनही सर्वसामान्य प्रवासी, चाकरमान्यांना प्रवास करता येत नाही. रेल्वेला भक्कम मासिक उत्पन्न देणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेत प्रवास करू द्यावा किंवा लोकलसारखी सुविधा सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी करीत आहेत. 

सुमारे दहा हजार चाकरमाने रोज जिल्ह्यात रेल्वेने येत होते. मात्र गेल्या मार्चपासून रेल्वेसेवा बंद होती. आता रेल्वे सुरू झाली. मात्र रेल्वेने मासिक पासवर अपडाउन करता येत नाही. रेल्वेने चाकरमान्यांचा विचार करीत अपडाउन करणाऱ्यांना सुरू असलेलया गाड्यांतून ये-जा करू द्यावी. 
नितीन सोनवणे, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news railway passenger stop chalisgaon bhusawal travling problem