
धान्य वाटपाबरोबरच ज्या लाभार्थ्याचे आधार, मोबाईल क्रमांक सीड झालेले नाहीत अशांचे आधार, मोबाईल क्रमांक सीड करण्याची कार्यवाही करता येणार आहे. आठवडेबाजाराला पूर्ण दिवस दुकाने सूरू राहतील.
जळगाव : जिल्ह्यात रेशनकार्डधारकांनाच स्वस्त धान्य दुकानांतून धान्याचे वाटप व्हावे, यासाठी सर्वच कार्डधारकांना आधार सिडिंग करण्याचे आदेश आलेले आहे. ३१ जानेवारीपर्यंत सर्व रेशनकार्ड आधारकार्डाशी संलग्न करावयाची आहेत. यामुळे सुटीच्या दिवशीही रेशन दुकाने सुरू ठेवावीत, असे आदेश सर्व रेशन दुकानदारांना दिले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली.
शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या लाभार्थ्यांचा मोबाईल, आधार क्रमांकाचे सिडिंग तसेच ‘केवायसी’ पडताळणीची कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आधार, मोबाईल क्रमांक रेशनकार्डाला संलग्न करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
श्री. सूर्यवंशी म्हणाले, की सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकेतील ज्या लाभार्थ्यांची आधार क्रमांक, मोबाईल सिडिंग अद्याप झालेली नाही केवळ अशाच लाभार्थ्यांचे आधार क्रमांक, मोबाईल सिडिंग आपण करून घेणार आहोत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांचे आधार, मोबाईल क्रमांक अद्याप सीड झालेले नाहीत अशा लाभार्थ्यांचे मोबाईल व आधार क्रमांकाचे सिडिंगची कार्यवाही रास्त भाव दुकानदारांनी करावयाची आहे. ज्यांनी यापूर्वी आधार क्रमांक, मोबाईल सिडिंग केलेली आहे त्यांना पुन्हा करण्याची गरज नाही. रेशन दुकाने आता सकाळी आठ ते दुपारी बार, तसेच दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत उघडी ठेवण्यात येतील.
आधार, मोबाईल क्रमांकही करणार सीड
धान्य वाटपाबरोबरच ज्या लाभार्थ्याचे आधार, मोबाईल क्रमांक सीड झालेले नाहीत अशांचे आधार, मोबाईल क्रमांक सीड करण्याची कार्यवाही करता येणार आहे. आठवडेबाजाराला पूर्ण दिवस दुकाने सूरू राहतील. ज्या गावात आठवडबाजार भरत असेल अशा ठिकाणी आठवडाबाजाराच्या दिवशी रास्त भाव दुकाने पूर्ण वेळ उघडी ठेवण्यात यावीत, विविध कारखाने, उद्योगधंदे असलेल्या क्षेत्रांत त्यांच्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी रास्त भाव दुकाने पूर्णवेळ उघडी ठेवण्यात यावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.
आकडे बोलतात
अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिका - सहा लाख नऊ हजार ९२२
आधार क्रमांक संलग्न नसलेल्या - १२ हजार ७६०
एकूण लाभार्थी - २८ लाख ११ हजार २५२
आधार संलग्न लाभार्थी - २३ लाख ६८ हजार ७६
आधार संलग्न बाकी - चार लाख ४३ हजार १७६
संपादन ः राजेश सोनवणे