रथोत्सवाची निमंत्रणपत्रिका दर्ग्यावर; १९० वर्षांची अखंड परंपरा 

प्रदीप वैद्य
Monday, 21 December 2020

स्वामी सच्चिदानंद महाराज व त्यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. स्वामी सच्चिदानंद महाराज समाधिस्थ झाल्याच्या काही काळानंतर मस्तानशहावली बाबा यांनीदेखील समाधी घेतली. तेव्हापासून दर वर्षी होत असलेल्या उत्सवाची निमंत्रणपत्रिका मस्तानशहा बाबांच्या दर्ग्यावर न चुकता दिली जाते.

रावेर (जळगाव) : सुमारे १९० वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या दत्तजयंती उत्सव रथ पालखी सोहळ्यानिमित्त या उत्सवाचे निमंत्रण ग्रामदैवत पाराचा गणपती मंदिर व समकालीन संतांच्या मठात जाऊन मंदिराचे पुजारी व हिंदू-मुस्लिम बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता. १९) देण्यात आले. 
रावेरच्या उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने १९० वर्षांची अखंड परंपरा असलेला उत्सव साध्या पद्धतीने पार पडणार आहे. या उत्सवाच्या अनुषंगाने अनेक कार्यक्रम व सोहळे स्वरूपदेखील शासकीय आदेशाचे पालन करीत साजरे होणार आहेत. या उत्सवापूर्वी समकालीन संत व ग्रामदैवतांना आमंत्रणे देण्याची प्रथा आहे. सच्चिदानंद स्वामी असताना भरविण्यात येणाऱ्या रथोत्सवात समकालीन संत मस्तानशहा बाबा सहभागी होत होते. 

म्‍हणून पहिली पत्रिका दर्ग्यावर
स्वामी सच्चिदानंद महाराज व त्यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. स्वामी सच्चिदानंद महाराज समाधिस्थ झाल्याच्या काही काळानंतर मस्तानशहावली बाबा यांनीदेखील समाधी घेतली. तेव्हापासून दर वर्षी होत असलेल्या उत्सवाची निमंत्रणपत्रिका मस्तानशहा बाबांच्या दर्ग्यावर न चुकता दिली जाते. त्याच प्रथेचे पालन १११ वर्षांपासून नियमित केले जात आहे. दत्तमंदिर संस्थानचे पाचवे गादीपती श्रीपाद महाराज यांनी गुरुदेव दत्तात्रय, समर्थ सदगुरू यांना कार्यक्रमाची पत्रिका अर्पण करून ग्रामदैवत पाराचा गणपती, रामास्वामी महाराज मठ, मस्तानशहा बाबा दर्ग्यावर निमंत्रणपत्रिका देऊन हा उत्सव शांततेत पार पाडण्याची प्रार्थना उपस्थिती हिंदू-मुस्लिम बांधवांनी केली. श्रीरंग महाराज, हृषीकेश कुलकर्णी, कपिल दुबे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रकाश भंगाळे, उमेश पाटील, प्रतीक पाटील, मुस्लिम बांधवांच्या वतीने नगरसेवक सादिक शेख, युसूफखा पठाण, गयास शेख यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news raver rathotsav first Invitation card dargah