वाघीणीनंतर आला पट्टेदार वाघ आला अन्‌ 

दिलीप वैद्य
Friday, 22 January 2021

परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येत आहेत. दरम्यान, याच भागात दोन वर्षांपूर्वी वाघीण आली होती आणि तिने दोन पिलांना जन्म दिला होता.

रावेर (जळगाव) : तापी नदी किनाऱ्यावरील पुरी- गोलवाडा शिवारात शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पट्टेदार वाघाचे अस्तित्व आढळले असून एका शेतकऱ्याच्या म्हशीचे पारडू आणि गाईच्या वासरीला जखमी केल्याची घटना आज घडली आहे. पायाच्या ठशांवरून हा प्राणी पट्टेदार वाघ असल्याचे वनविभागाने मान्य केले असून वनविभागाचे कर्मचारी पुरी गोलवाडा येथे रवाना झाले आहेत. 

गोलवाडा येथील अंबादास पाटील या शेतकऱ्याच्या शेतात बांधलेले म्हशीचे पिल्लू त्यांना आज सकाळी जखमी अवस्थेत आढळले. त्याच्या अंगावर ओरखडे दिसून आले. त्यांनी परिसरात शोध घेतला असता जंगली श्वापदाचे पायाचे ठसे आढळून आले. त्याची छायाचित्रे काढून त्यांनी ती वनविभागाकडे पाठवली असता हा प्राणी वाघ असल्याचे या कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

जखमी प्राण्यांवर उपचार सुरू
दरम्यान, याच शेतकऱ्याच्या गाईच्या वासरावर देखील वाघाने हल्ला केला असून दोन्ही जखमी प्राण्यांवर उपचार सुरू आहेत. वनक्षेत्रपाल मुकेश महाजन यांनी या घटनेची नोंद घेतली असून सहाय्यक वनरक्षक आणि कर्मचाऱ्यांना पुरी येथे पाठवले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन महाजन यांनी केले आहे.

दोन वर्षापुर्वी आली होती वाघीण
वनविभागाचे वनपाल अरविंद धोबी, अतुल तायडे आणि कर्मचारी सुनील पाटील यांनी भेट दिली. यावेळी शेतकरी अंबादास पाटील, सुधीर पाटील, संदीप पाटील उपस्थित होते. या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येत आहेत. दरम्यान, याच भागात दोन वर्षांपूर्वी वाघीण आली होती आणि तिने दोन पिलांना जन्म दिला होता. तापी नदी काठावरील हतनूर प्रकल्पाच्या दाट झाडीत वाघिणीला आणि पिलांना लपण्यासाठी जागा असून या भागात नेहमीच पट्टेदार वाघाचे अस्तित्व आढळून येते.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news raver tiger attack cow and baffellow