esakal | रेडिमेड गादी घेताय तर सावधान..त्‍यातून घरात येवू शकतो आजार​

बोलून बातमी शोधा

Readymade mattress

घरात पलंगावर गादीसाठी कापूस नसला तर रेडिमेड गादी घेतली जाते. गादी भांडारात तयार होणाऱ्या या गादीबाबत कोणत्‍याही प्रकारची गॅरंटी नसते. झोपताना आराम वाटावा याकरीता घरात गादी आणत असाल तर सावधान..यातून घरात आजार विकतच घेत असल्‍याची शक्‍यता अधिक आहे.

रेडिमेड गादी घेताय तर सावधान..त्‍यातून घरात येवू शकतो आजार​
sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : कोरोनाचा काळ सुरू असून यातून आरोग्‍याचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आहे. प्रत्‍येकाला काळजी घ्‍यावी लागत आहे. अशात सुरक्षितता म्‍हणून तोंडाला लावून फेकण्यात आलेले मास्‍क जमा करून त्‍याची गादी भरण्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे या गादीमधून घरात आजारच आणला जाणार. 

दवाखान्यातून निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा आहे. बायोमेडिकल वेस्ट गोळा करून त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना कोरोना रुग्णांसाठी वापरात आलेले मास्क, डायपरचा वापर चक्क कापूस म्हणून केला जात असल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला. जळगावातील महाराष्ट्र गादी भांडारमध्ये हा प्रकार होत असल्‍याचे उघड झाल्‍यानंतर संचालक अमजद अहमद मन्सुरी (रा. आझादनगर) याला पोलिसांनी अटक केली.

गादीच्या आत भरलेय काय- काय
रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, वॉर्डबॉय आणि नर्सेस शास्त्रशुद्ध मास्कसोबतच डिस्पोझेबल मास्कही लावतात. तसेच रुग्णांना शौच, लघवीसाठी वारंवार नेणे अशक्य होत असल्याने त्यांच्यासाठी डायपरची सुविधा करण्यात आलेली असते, असे डायपर आणि मास्कचा वापर चक्क गाद्या भरला जात असल्‍याचा गंभीर प्रकार आढळून आला. 

घरचाच कापूस न्या..
रूग्‍णालयातून निघणारा बायोमेडिकल वेस्टद्वारे नव्या गाद्या भरून त्यांची विक्री करण्यात येतात. विकत घेणाऱ्या त्‍या अगदी कमी म्‍हणजे परवडतील अशा दरात गादी भांडारमधून विकल्‍या जातात. घेणारा व्यक्‍ती गादी मऊ असल्‍याची चाचपणी करून घेत असतो. परंतु, त्‍या गादीत काय भरले आहे; याची कल्‍पना त्‍याला नसते. याकरीता शेती असल्‍यास घरचा कापूस गादी भरण्यासाठी न्यावा. कापूस नसेल तर कापूस विकत घेवून त्‍याची गादी भरण्याचे काम करावे. अन्यथा रेडिमेड गादीच्या नादात फसवणूक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.