‘कृत्रिम’ वणव्यात होरपळतोय सातपुडा; हजारो हेक्टर वृक्षसंपदा खाक 

Satpuda
Satpuda

धानोरा (जळगाव) : एकेकाळी हिरवळीने नटलेल्या जणू हिरवा शालू परिधान करून दिमाखात उभ्या सातपुडा पर्वतावर वृक्षतोडीची धारदार कुऱ्हाड चालवणाऱ्या लोकांची संख्या दिवसागणिक वाढतेय. तर अलीकडे पर्वतामधील जंगलात अज्ञातांकडून आग लावली जाऊन या आगीत संपूर्ण सातपुडा होरपळतोय. 
धानोरापासून उत्तरेत असलेल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या चिंचपाणी धरणाच्या वरील बाजूस गेल्या काही दिवसांपासून वणवा पेटलेला असल्याने याठिकाणी हजारो हेक्टरवरील वृक्षसंपदा नष्ट झाली असून, जंगली प्राण्यांनाही आगीमुळे नुकसान झाले आहे. 

वनौषधी होतेय नष्ट 
सातपुडा जंगलात पूर्वी सहज मिळणारे सागवान, तिवस, खैर, सिसम, धावडा, कड, अंजन, आवळा, टेक, टेंबूर, निर्मोळी, लाजाळू ही मौल्यवान वृक्ष दुर्मिळ होत चालली आहेत. सफेद मुसळी, कृष्णमुसळी, अर्जुन शतावरी, अश्वगंधा, बेहडा या वनौषधी नष्ट होत चालल्या आहेत. ही सर्व आयुर्वेदिक वनस्पती आहे. 

पशू-प्राण्यांची हानी 
त्याचबरोबर हरिण, ससा, बिबट्या, माकड, अस्वल, कोल्हा, लांडगा आदी प्राण्यांचे वास्तव आहे. हे सर्व असताना देखील जंगलाला आग लावली जात आहे. लागणाऱ्या वणव्यामुळे वन्यप्राणी सैरावैरा पळत सुटतात. या आगीत मौल्यवान वनस्पतींचे नुकसान होत असून, पशुपक्ष्यांसहित वन्यप्राणी जखमी होऊन मृत्युमुखी पडताना दिसतात. जीव वाचवविण्यासाठी वन्यजीव भेदरलेल्या अवस्थेत सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी व अन्नाच्या शोधात त्या ठिकाणी असलेल्या गायी, म्हशी, शेळ्या आदी पाळीव प्राण्यांचा फडशा पाळताना दिसून येत असतात. 
 
वन विभागाचे दुर्लक्ष 
सातपुडा पर्वतात जिल्ह्याबाहेरील, तसेच मध्य प्रदेशातील बरेचसे लोक बेकायदा घरे बांधून राहतात आणि वृक्ष तोडतात. हे लोक शेती करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक आग लावतात. अनेकवेळा पुराव्यासह याविषयी माहिती समोर येऊनही वन प्रशासन त्याचा काहीच बंदोबस्त करत नसल्यामुळे त्याच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर काही लोक हेतूपुरस्सर जंगलात आग लावून मोठमोठी झाडे पाडून ते पूर्णपणे सुकल्यावर जवळील गावामध्ये त्या लाकडांची सर्रास विक्री करताना दिसून येत असतात. परंतु या गोष्टींकडे वनअधिकारी व कर्मचारी निमूटपणे पाहत राहून याकडे दुर्लक्ष करतात. 
 
संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com