esakal | वादळी वाऱ्यात तरूणाचा गेला जीव; झाडाची फांदी पडल्‍याने झाला घात
sakal

बोलून बातमी शोधा

storm

जिल्‍ह्‍यात शनिवारी सायंकाळी आलेल्या वादळात शहरासह परिसरात अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाली. तर काही ठिकाणी झाडे कोसळून पडली.

वादळी वाऱ्यात तरूणाचा गेला जीव; झाडाची फांदी पडल्‍याने झाला घात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सावदा (जळगाव) : शहर व परिसरात शनिवारी सायंकाळी झालेल्या वादळाच्या तडाख्यात एका तरुणाला जीव गमवावा लागला. वादळाने झाडाची फांदी अंगावर पाडल्याने जखमी झालेल्या येथील चेतन सुभाष पाटील (वय 28) या युवकाचे उपचार घेत असताना निधन झाले.
जिल्‍ह्‍यात शनिवारी सायंकाळी आलेल्या वादळात शहरासह परिसरात अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाली. तर काही ठिकाणी झाडे कोसळून पडली. यामुळे साऱ्यांची धावपळ उडाली होती. याच दरम्‍यान सावदा शहरातील क्रांती चौकातील रहिवासी तथा अन्नपूर्णा मेसचे मालक चेतन सुभाष पाटील हे क्रांती चौकातून घरी पायी जात होते. अचानक आलेल्या वादळात त्यांचा अंगावर झाडाची फांदी पडली. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने भुसावळ येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात उपचार सुरू असतांनाच त्यांनी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास निधन झाले.

चिमुकलीचे पितृछत्र हरपले
चेतन पाटील हे सुभाष पाटील यांचे पुत्र असून त्यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी आणि एक चिमुकली कन्या असा परिवार आहे. चेतन हे मन मिळाऊ स्वभावाचे व सर्वांच्या उपयोगी येणारे व्यक्तीमत्व होते. दरम्यान, जोरदार वादळी पावसामुळे परिसरात मोठी हानी झालेली आहे. विशेष करून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत असून शासनातर्फे आपत्तीग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. 

आमदार चंद्रकांत पाटलांकडून कुटुंबीयांचे सात्वन
दरम्यान आज (ता.21) दुपारी एकच्या सुमारास आमदार चंद्रकांत पाटील, प्रांताधिकारी कडलग, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी मयत चेतन पाटील यांचे वडील सुभाष पाटील व कुटुंबीयांची भेट घेऊन सात्वन करत धीर दिला. यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी सात्‍वंन करताना म्हणाले, की चेतनच्या कुटूबीयांच्या पाठीशी सरकार उभे राहील आणि परिवाराला शासनाच्या अपघातग्रस्त निधीतून कमीत कमी चार लाख रुपये व त्यापेक्षा ही अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्‍याचे आश्‍वासन दिले.

loading image