
नोव्हेंबरमध्ये नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. परंतु, मार्चपासून आजतागायत बंद असलेले पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग देखील आता सुरू होणार आहेत. त्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातर्फे करण्यात येवून शाळांना तशा सुचना देण्यात आल्या आहेत.
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाल्यानंतर अर्थात मार्च २०१९ पासून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली, ती आतापर्यंत बंदच होती. प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर म्हणजे २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आल्यानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात येत असून, जळगाव जिल्ह्यातील ७३७ शाळा उघडणार आहेत.
देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला. देशात आणि राज्यात देखील याचा शिरकाव झाल्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे 18 मार्चपासून शाळा बंद करण्यात आल्या होत्या. अर्थात यानंतर सातत्याने वाढणाऱ्या प्रादुर्भावामुळे आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शाळा, महाविद्यालय बंदच ठेवण्यात आली होती. परीक्षा देखील होवू न शकल्याने सरासरीप्रमाणे गुण देवून निकाल लावण्यात आले होते. नोव्हेंबरमध्ये नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. परंतु, मार्चपासून आजतागायत बंद असलेले पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग देखील आता सुरू होणार आहेत. त्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातर्फे करण्यात येवून शाळांना तशा सुचना देण्यात आल्या आहेत.
तीन शिक्षक पॉझिटीव्ह अन्य रिपोर्ट येणे बाकी
शासनाच्या निर्देशानुसार शाळा सुरू करण्यापुर्वी शिक्षक व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाकडून सर्व शाळास्तरावर सुचना देत शिक्षकांना कोरोना टेस्ट करण्यास सांगितले. जिल्ह्यात पाचवी ते आठवीचे ७ हजार ४६५ शिक्षक आहेत. या शिक्षकांच्या घेण्यात आलेल्या कोरोना टेस्टमध्ये पारोळा तालुका २ आणि एरंडोल तालुक्यात एक असे तीन शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. शिवाय, अद्यापपर्यंत कोरोना टेस्टचे रिपोर्ट येणे बाकी आहे. हे रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर यातून काही रिपोर्ट पॉझिटीव्ह येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२ लाखाहून अधिक विद्यार्थी
जिल्ह्यातील ७३७ पाचवी ते आठवीच्या शाळांमध्ये एकूण २ लाख १४ हजार २९४ विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी बुधवारी (ता.२७) शाळांमध्ये येणार असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत सर्व उपाययोजना करत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच सोशल डिस्टसिंगचे पालन करून शाळांमध्ये किती बॅचेस होतात; त्यानुसार शाळांची वेळ ठरविण्याबाबतच्या सूचना संबंधित शाळांना देण्यात आल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी रागिनी चव्हाण यांनी सांगितले.