
घरात लहान मुलांसोबत असताना अगदी सावधान राहणेच गरजेचे आहे. थोडासाही बेसावधपणा आयुष्य उध्वस्त करू शकते. पण कधीतरी मोठ्यांची बेसावधपणा आणि लहानग्यांचे प्रसंगावधान खुप कमीच असते. पण असे घडले जळगावात. आईची चुकी जीवाशी आली होती. मात्र चिमुकलीने प्रसंगावधान दाखविल्याने अनर्थ टळला.
जळगाव : शहरातील कोल्हेनगर परिसरात राहणाऱ्या विवाहितेने गरम पाण्यासाठी लावलेले हिटर बटन बंद न करताच बादलीत हात घातला. यात विजेचा जोरदार धक्का बसला. परंतु पाच वर्षाच्या मुलीने प्रसंगावधानाने लहान बहिणीला दूर नेत हिटरचे बटन बंद करून आई व बहिणीचे प्राण वाचविले.
कोल्हेनगर परिसरात काळे परिवार वास्तव्यास आहे. एमआयडीसीतील एका कंपनीत अधिकारी पदावर प्रसाद काळे कार्यरत आहे. कोल्हेनगरात ते पत्नी गुलबक्षी (वय ३३), मुलगी शिवांगी (वय ५) आणि इशान्वी (वय २) यांच्यासह वास्तव्याला आहे. प्रसाद काळे हे सकाळी नऊला ड्यूटीवर गेल्यावर घरी पत्नी आणि दोन्ही मुली होते.
गरम पाण्यासाठी लावले हिटर
दोघा मुलींची आंघोळ घालायची म्हणून गुलबक्षी यांनी स्टीलच्या बादलीत हिटर लावले. पाणी गरम झाले; परंतु मुलींनी अंघोळ करण्यास नकार देत बाहेर खेळण्यासाठी गेल्या. दोन्ही मुली बाहेर गेल्याने केव्हाही घरात येऊ शकतात धोका नको; म्हणून त्यांनी बटन बंद करून पाणी थंड केले. त्यानंतर गुलबाक्षी यांनी स्वत:च्या आंघोळीसाठी पाणी गरम केले. परंतु पाणी घेतांना हिटरचे बटन बंद न करता बादलीत हात टाकला असता त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला.
आवाज ऐकून मुली आल्या आणि..
विद्युत शॉक लागल्याने त्या फेकल्या गेल्या. याचा आवाज झाल्याने बाहेर खेळत असलेल्या दोन्ही मुली घरात धावत आल्या. आईचा चेहरा पाहून आई आपल्याशी गंमत करत असावी असे म्हणून लहान मुलीने आईजवळ हसत धाव घेतली. परंतु मोठी मुलगी शिवांगी हिने प्रसंगावधान राखत बहिणीला आईपासून लांब करत प्लॅस्टीक स्टूलवर उभे राहून हिटरचे बटन बंद केले. थोडा उशीर झाल असता तर कदाचित आई गुलबाक्षी व बहिण इशान्वी यांच्या बाबतीत दुर्घटना घडली असती.