चार किलोमीटरचे काम दीड वर्षानंतर ‘जैसे थे’

देवीदास वाणी
Tuesday, 29 December 2020

चौपदरीकरणाचे काम चिखली ते तरसोद व तरसोद ते फागणे अशा दोन विभागांत विभागले आहे. तरसोद ते फागणेदरम्यान एरंडोल, पारोळा येथे चौपदरीकरणाच्या कामात काहीअंशी गती आहे.

जळगाव : जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास हवी त्याप्रमाणात गती मिळाले नसल्याचे चित्र आहे. तरसोद ते फागणेदरम्यान चौपदरीकरणाचे काम तरसोद फाट्याजवळच गेल्या दीड वर्षापासून संथगतीने सुरू आहे. ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चरने सब कंत्राटदार नेमला. मात्र त्यांना पुरविण्यात येणारा मुरूम, रस्ता तयार करण्यासाठी तोडावी लागणारी झाडे, अडचणीचे ठरणारे विजेचे खांब हटविण्याबाबत अद्यापही हालचाली नसल्याने चार किलोमीटरचे काम दीड वर्षानंतरही पूर्ण झालेले नाही. 
चौपदरीकरणाचे काम चिखली ते तरसोद व तरसोद ते फागणे अशा दोन विभागांत विभागले आहे. तरसोद ते फागणेदरम्यान एरंडोल, पारोळा येथे चौपदरीकरणाच्या कामात काहीअंशी गती आहे. मात्र ज्या ठिकाणावरून हा कामातील मार्ग सुरू होतो अशा तरसोद फाट्याजवळ अद्यापही सर्व्हिस रस्ते तयार नाहीत. सर्व्हिस रस्ते तयार करण्यासाठी कच्चा मार्गाचे खोली करण झाले. त्यात गेल्या सहा महिन्यांपासून अजून मुरूम टाकून रस्ता तयार करण्याचेच काम सुरू आहे. 
ज्या कंत्राटदाराला काम दिले त्याला मुरूमाची उपलब्धता, रस्ता बनविण्याच्या मार्गात येणारे खांब, झाडे, विहिरी आदी अडथळे हटविण्याबाबत परवानग्या दिलेल्या नाहीत. कंत्राटदाराने ग्राउंड क्लिरिंग केले आहे. मात्र पुढे मुख्य ठेकेदार कंपनीने मार्किंग करून दिलेले नाही. यामुळे रस्ता कोठेपर्यंत तयार करायचा याची ‘लाइन ऑफ ॲक्शन’ आखण्यात आलेली नाही. ॲग्रो इन्फ्रास्ट्रक्चरने तरसोद फाट्याजवळील कामे अगोदर पूर्ण करावे नंतर इतर ठिकाणचे काम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांची आहे. 
 
अंडरपास असणार ८० मीटर लांब 
तरसोद फाट्याजवळ व्हेइकल अंडरपास (व्हीयूपी) आहे. तो ८० मीटर लांब आहे. त्यासाठी नशिराबादकडून येणाऱ्या महामार्गाल कनेक्टिंग साइड रस्ते तयार करायचे आहेत. साइड रस्त्यांचे काम अजून थंड बस्त्यात आहे. तर व्हीयूपी केव्हा तयार होईल? याकामाच्या गतीसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news tarsod asoda road fourway work stop