गरम पाण्याचा झरा रिकामाच वाहणार; श्रीक्षेत्र उनपदेव सुनेसुने 

रोहिदास मोरे
Thursday, 14 January 2021

उनपदेव येथे १९५६ पासून यात्रोत्सव सुरू आहे. येथे पौष महिन्यात महिनाभर यात्रा भरते. यंदा ही यात्रा १४ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान होणार होती.

अडावद (जळगाव) : उनपदेव (ता. चोपडा) येथील यात्रोत्सव यंदा गुरुवार (ता. १४)पासून सुरू होणार होता. मात्र, कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी यात्रोत्सव रद्द केला असून, दीडशे वर्षांची परंपरा खंडित झाली आहे. दर वर्षी पौषमध्ये महिनाभर या ठिकाणी यात्रेची धूम असते. मात्र, यंदा या उत्सवापासून भाविक मुकणार आहेत. यात्रोत्सवानिमित्त कुठलीही दुकाने थाटू नयेत, तसेच भाविकांनीही गर्दी टाळावी, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ समितीने केले आहे. 
उनपदेव येथे १९५६ पासून यात्रोत्सव सुरू आहे. येथे पौष महिन्यात महिनाभर यात्रा भरते. यंदा ही यात्रा १४ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान होणार होती. मात्र, कोरोनामुळे यात्रा रद्द करण्यात आली. 

अशी आहे आख्यायिका 
श्रीराम रावणाचा वध करून उनपदेव येथे शरभंग ऋषींच्या आश्रमात पोचले. ‘शरभंग त्रसदेह स्वर्ग गमनम’ असा या स्थळासंबंधीचा पुराणात उल्लेख असल्याचे जाणकार सांगतात. महर्षी शरभंग कुष्ठरोगी असल्याने त्यांना रोगापासून मुक्त करण्यासाठी रामाने अग्निबाण जमिनीत रोवला. त्या वेळी जमिनीतून निघालेल्या जलधारेत स्नान केल्याने महर्षी कुष्ठरोगमुक्त झाले. ही जलधारा म्हणजेच सध्याचा उनपदेव येथील गरम पाण्याचा झरा होय, अशी आख्यायिका आहे. 

मास्क लावून दर्शन 
गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी मास्क लावून व सोशल डिस्टन्सिंग पाळून दर्शन घ्यावे व जास्त गर्दी करू नये. तसेच लांब अंतरावर उभे राहावे, असे आवाहन वन विभाग व वनक्षेत्र अडावद व ग्रामस्थांनी केले आहे. 

व्यावसायिकांनाही फटका 
परिसरात कृष्ण, राम, सीता, लक्ष्मण, हनुमान, महादेव, गणपती व शनिमंदिर आहे. उत्तरेस टेकडीवर गोविंद महाराजांची समाधी आहे. जेथे गरम पाण्याचा झरा आहे त्याच्या मागील बाजूस शरभंग ऋषींची गुहा आहे. या गुहेत महादेवाची पिंडी आहे. यंदा यात्रोत्सव नसल्याने लाखो रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे. एसटीचेही उत्पन्न बुडणार आहे. छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही याचा फटका बसणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news unapdev yatrotsav not arrenge corona impact