Budget 2021 News : भुसावळ- खरगपूर कॉरिडॉर अन्‌ पाचोरा- जामनेर मार्ग होणार ब्रॉडगेज

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 February 2021

पश्चिम बंगालमधील खरगपूर हे शहर औद्योगिकदृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. त्यातच आयआयटीमुळे विशेष महत्त्व असल्‍याने भुसावळ ते खरगपूर कॉरिडॉर ही घोषणा महत्त्वपूर्ण ठरणारी आहे.

जळगाव : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्‍या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेचा अर्थसंकल्प देखील सादर केला. रेल्वेच्या अर्थसंकल्पात जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण घोषणा झाली. यानुसार भुसावळ ते पश्चिम बंगालधील खरगपूर दरम्यान कॉरिडॉरची उभारणी करण्यास मान्यता मिळाली. तसेच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा- जामनेर या मीटर गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये रूपांतर करण्यास मान्यता दिली आहे.

रेल्वे अर्थसंकल्पात भुसावळ ते खरगपूर कॉरिडॉरची घोषणेमुळे शिक्षणासह व्यापार- उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. पश्चिम बंगालमधील खरगपूर हे शहर औद्योगिकदृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. त्यातच आयआयटीमुळे विशेष महत्त्व असल्‍याने भुसावळ ते खरगपूर कॉरिडॉर ही घोषणा महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. अर्थात शिक्षण, व्यापार तसेच उद्योगाच्या अनुषंगाने मोठी उपलब्धी असली तरी भुसावळ ते खरगपूर कॉरिडॉर कसा असेल, यासाठीचा बजेट कितीचा आहे; याबाबत स्‍पष्‍ट माहिती मिळालेली नाही.

पश्चिम बंगालशी जुडणार जळगाव
रेल्वे अर्थसंकल्पात भुसावळ ते खरगपूर कॉरिडॉर तयार झाल्‍यास भुसावळवरून खरगपूरला जाण्यासाठी विशेष एक्सप्रेस रेल्‍वे देखील सुरू होवू शकते. तसेच व्यापार, उद्योगाच्या अनुषंगाने मालवाहतूक गाड्याही या कॉरिडॉरच्या माध्यमातून चालवल्या जाऊ शकतात. हा कॉरिडॉर जळगाव जिल्ह्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार; कारण जळगाव जिल्हा थेट पश्चिम बंगालची जोडला जाईल. त्यामुळे खरगपूर आयआयटी त्याचप्रमाणे तेथील उद्योग- व्यवसायाशी आपल्या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना संबंध जोडता येतील.

पाचोरा- जामनेर गेज मार्गाचा होणार विस्‍तार
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना रेल्वेसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. डिसेंबर 2023 पर्यंत रेल्वेचे ब्रॉडगेज पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते जामनेर दरम्यान असलेल्या मीटर गेज मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. विशेष म्‍हणजे ब्रॉडगेज रेल्‍वे मार्ग करताना तो जामनेरपासून पुढे बोदवडपर्यंत वाढविण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा ते बोदवड दरम्यान ब्रॉडगेज पूर्ण करण्याची मागणी होती; ती यंदाच्या सादर झालेल्‍या बजेटमधून पुर्ण होणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news union budget railway bhusawal kharagpur coridor