अखेर वाळू लिलावाची कोटींच्या कोटी उड्डाणे सुरू; आठ वाळू गटांचा झाला लिलाव 

देवीदास वाणी
Monday, 25 January 2021

जिल्ह्यातील फैजपूर, अमळनेर, एरंडोल, जळगाव उपविभागातील एकवीस ठिकाणी असलेल्या नदीपात्रातील वाळू साठे यांच्या लिलाव प्रक्रियेसाठी चार जानेवारी रोजी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती.

जळगाव : अखेर जिल्हयातील वाळू गटांचे लिलाव झाले आहेत. जिल्ह्यातील २१ वाळू गटांपैकी ८ वाळू गटांची लिलावाची प्रक्रिया नुकतीच झाली. त्यात कोटींच्या कोटी उड्डाणे झाली आहे. साडेकोटी रूपये ८ वाळू गटांच्या लिलावातून मिळणे अपेक्षीत असताना तब्बल सव्वातीन कोटी रूपये अधिकचा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळाला आहे. आठ गटांच्या लिलावातून दहा कोटी ८८ लाख ६० हजार ६१३ रुपये महसूल मिळणार आहे. 
गेल्या दीड-दोन वर्षापासून रखडलेल्या वाळू घाटांचे लिलाव गेल्या दिड गेल्या दिड पावणे दोन वर्षापासून रखडले होते. पर्यावरण प्रभाव आकलन प्राधिकरणाने जिल्ह्यातील वाळू गटांचा अभ्यास करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल राज्य शासन स्तरावर सादर केल्यानंतर गेल्या डिसेंबर २०२० मध्ये वाळू गट लिलाव मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील २१ वाळू गटांपैकी ८ वाळू गटांची लिलावाची प्रक्रिया पार पडली. 

जिल्ह्यातील फैजपूर, अमळनेर, एरंडोल, जळगाव उपविभागातील एकवीस ठिकाणी असलेल्या नदीपात्रातील वाळू साठे यांच्या लिलाव प्रक्रियेसाठी चार जानेवारी रोजी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. निविदा नूकत्याच उघडण्यात येऊन ऑनलाईन ई ऑक्शन प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात आली. 

२१ ठिकाणी वाळू घाट
जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या वाळू घाटांमधील बहुतांश ठिकाणी एक हेक्टर ते चार हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत वाळू घाट मधील वाळू उचलण्याची परवानगी आहे. तापी, सुकी, गिरणा आदी नदी, नाले पात्रातील २१ ठिकाणी असलेल्या वाळू घाटांची अंदाजे किंमत २९ कोटी रुपये आहे. 

आठ निविदाकारांचा सहभाग 
वाळू घाट ए ऑक्शन लिलाव प्रक्रियेत आठ निविदाकारांनी सर्वोच्च बोली लावली होती यात घाडवेल (निलेश पाटील), बांभोरी प्र.चा. (पटेल ट्रेडिंग), आव्हाने (स्टार बालाजी ऑनलाईन लॉटरी), नारणे (सुनंदाबाई बिल्डर्स), टाकरखेड (व्ही.के. इंटरप्राईजेस), वैजनाथ (श्री श्री इन्फ्रा), उत्राण अ.ह, (एम.एस.बिल्लर्ड व महेश सदाशिव माळी) अशा आठ निविदाकारांनी सर्वोच्च बोली लावली. या आठ ठिकाणांसाठी दहा कोटी ८८ लाख ६० हजार ६१३ रुपये किमतीचे निविदा मंजूर करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi jalgaon news valu lilav process in district