esakal | वरणगावात सव्वादोन लाखांचा गुटखा जप्त

बोलून बातमी शोधा

tobacco
वरणगावात सव्वादोन लाखांचा गुटखा जप्त
sakal_logo
By
टिम इ सकाळ

वरणगाव : गुटखा बंदी असताना वरणगाव येथील प्रतिभानगरात बेकायदा गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दोन लाख ३४ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरात गुटखा व्यावसायिकांवरील ही तिसरी कारवाई असून, शहरात खुलेआम गुटखामाफियांचे रॅकेट सक्रिय झाले आहे. यावर कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

कोरोना संसर्ग वाढत असल्याने शासनाकडून निर्बंध कडक केले जात आहेत. त्याच अनुषंगाने प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी शहरातील विविध भागांमध्ये गस्त वाढविली आहे. त्याच अनुषंगाने गस्तीवर असताना पोलिस कर्मचारी योगेश जोशी यांना रविवारी (ता. १८) रात्री प्रतिभानगरातील एका खासगी रुग्णालयामागील बाजूला शेख शोएब खाटिक (डीके) (वय ३५, रा. प्रतिभानगर, वरणगाव) यांच्या मालवाहू ॲपेरिक्षामध्ये (एमएच १९, एस ६६७३ मध्ये बेकायदा गुटखा वाहतूक करीत असताना आढळून आला.

पोलिसांनी स्‍वतः दिली फिर्याद

वरणगाव पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन संशयितासह वाहन व मुद्देमाल ताब्यात घेतला असून, फिर्यादीसाठी अन्न व औषध विभागाच्या जळगावातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी कोरोना संसर्गामुळे शासकीय नियमांचे व कामकाजात व्यस्ततेचे कारण देत नकार दर्शविल्याने वरणगाव पोलिसांनी स्वतः फिर्याद देऊन (ता. २०) मंगळवारी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात संशयित शोएब खाटिक (वय ३५) याला ताब्यात घेऊन सुमारे दोन लाख ३४ हजार ४२० किमतीच्या तंबाखूचे पाऊच व एका लहान गोणीत ५२ पाकिटे प्रत्येक पाकिटांमध्ये २२ पाऊच सुंगधित विमल पानमसाला, व्हीवन तंबाखू मुद्देमालसह आढळून आला व हा मुद्देमाल मानवी सेवनास घातक आहे. याची जाणीव असूनही कायद्याची तमा न बाळगता आर्थिक फायद्यासाठी त्याची वाहतूक करण्याच्या उद्देशाने आढळून आल्याने संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरणगाव पोलिस तपास करीत आहे.