
अनेकांना मुल होत नाही म्हणून दवाखान्यात इलाज करतात. परंतु, मुल झाल्यानंतर त्यातही पुरूष जातीचे अर्भक अगदी रस्त्याच्या बाजूला टाकून महिलेने पलायन केल्याची घटना उघड झाली आहे. बाळाचा रडण्याचा आवाज येत असल्याने हा प्रकार उघड झाला.
यावल (जळगाव) : धानोरा रस्त्यावर एका अज्ञात महिलेने अवघे एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक रस्त्याच्या बाजूला सोडून पलायान केल्याची घटना रविवारी उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या हा प्रकार लक्षात आल्यामुळे अर्भकाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्यात आले. तेथून या अर्भकाला जळगाव नेण्यात आले आहे.
दोघे गाडीवर आले अन् बाळाला सोडून गेले
दुपारी साडे बाराच्या सुमारास डांभुर्णी शिवारातील एका शेतात लाल रंगाची साडी परिधान केलेली महिला व पुरुष दुचाकीने आले आणि त्यांनी शेताच्या बांधावर अर्भकाला सोडून निघून गेल्याची शेतमजूर महिलेसह पिक सरंक्षण सोसायटीचे रखवालदार देविदास सोळुंके यांच्या लक्षात आला. त्यांनी याबाबत डांभुर्णीचे पोलिस पाटील किरण कचरे यांना माहिती दिली.
अर्भक रूग्णालयात दाखल
सदरच्या घटनास्थळी पोलिसांनी पाहणी केली असता नवजात बालक हे पुरूष जातीचे असल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांच्या मदतीने अर्भकास प्रथम यावल ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. यानंतर जळगाव जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पोलिस पाटील किरण कचरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यावल पोलिस स्टेशनला महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करत आहेत
संपादन ः राजेश सोनवणे