
लॉकडाउनमध्ये गावाकडे जावे लागले. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर ग्रामपंचायतींची निवडणुक लागली. यात आपोती ग्रामपंचायत देखील होती. मागील दहा महिन्यांपासून गावात असल्याने संपर्क वाढला आणि त्याचा उपयोग वैभवला निवडणुकीत झाला. आता तो गावचा सरपंच म्हणून धुरा सांभाळणार आहे.
जळगाव : घरात ना राजकीय वारसा, ना गावात कोणत्या राजकिय पक्षाचा सपोर्ट. अशात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी स्वतःचे पॅनल तयार करून बड्या पक्षांना धोबीपछाड करण्याची कामगिरी घडली ती आपोती (जि.अकोला) या ग्रामपंचायतीत. विशेष म्हणजे इंजिनिअरींगचे शिक्षण पुर्ण झालेला बावीस वर्षीय तरूण आता गावकारभारी बनला आहे.
आपोती (जि. अकोला) येथील रहिवासी असलेला वैभव देविदास तराळे (वय २२) हा तरूण इंजिनिअरींगचे शिक्षण घेण्यासाठी जळगावच्या गोदावरी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये आला होता. इंजिनिअरींगचे शेवटचे वर्ष होते. परंतु गतवर्षी कोरोनाच्या प्रभावामुळे लागलेल्या लॉकडाउनमध्ये गावाकडे जावे लागले. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर ग्रामपंचायतींची निवडणुक लागली. यात आपोती ग्रामपंचायत देखील होती. मागील दहा महिन्यांपासून गावात असल्याने संपर्क वाढला आणि त्याचा उपयोग वैभवला निवडणुकीत झाला. आता तो गावचा सरपंच म्हणून धुरा सांभाळणार आहे.
स्वतःचे पॅनल अन् ग्रामपंचायत काबीज
वैभव तराळे याच्या घरात कोणत्याही प्रकारचा राजकिय वारसा नाही. वडील राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून नोकरीस तर आई गृहिणी आहे. परंतु, वैभवला राजकारणाची आवड महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच लागली. अशात लॉकडाउनमध्ये गावात गेल्याने गावातील तरूणांना घेवून ग्रामपंचायत निवडणुकीत अपक्ष म्हणून स्वतःचे पॅनल उभे केले. प्रथमच निवडणुक लढवत असताना ग्रामपंचायत काबीज करणे शक्य नव्हते. पण हे वैभवने करून दाखविले. सात सदस्यीय असलेल्या ग्रामपंचायतीवर पाच सदस्य हे वैभव तराळेच्या पॅनलचे निवडून आले.
‘सकाळ-यिन’चा अध्यक्ष होता वैभव
गोदावरी इंजिनिअरींग महाविद्यालयात वैभव शिक्षण घेत असताना तो दोन वर्षांपासून ‘सकाळ-यिन’चा सदस्य राहिला आहे. शिवाय त्याने कॉलेज अध्यक्ष म्हणून पद सांभाळले आहे. त्याचप्रमाणे चार वर्षांपासून रोटरॅक्ट इंटरनॅशनलमध्ये सहभाग, विद्यापीठ प्रतिनिधी राहून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर विद्यापीठ चळवळीत सक्रीय होता.
इंजिनिअर बहिण- भाऊ विजयी
वैभव तराळे हा निवडून आला असून तो आता सरपंच म्हणून गावाची धुरा सांभाळणार आहे. इतकेच नाही, तर वैभवची बहिण पुजा तराळे हिने देखील इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले असून ती देखील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाली आहे. यामुळे दोन्ही इंजिनिअरींग झालेले बहिण- भाऊ आता ग्रामपंचायतीची धुरा सांभाळणार; हे मात्र नक्की.