
सर्वच्या सर्व चाचण्या ह्या निगेटिव्ह आल्या आहेत त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. प्रत्येकाने टाळ्यांचा एकच गजर करत आनंदोत्सव साजरा केला.
अमळनेर : निवडणूक निकाल असो की परीक्षेचा निकाल... तो पॉझीटिव्ह लागल्यानंतर जल्लोष तर होतोच!.. मात्र शहरात एके ठिकाणी निकाल लागला अन् निकाल 100 टक्के निगेटिव्ह लागल्यानंतर उपस्थितांनी नाराजी व्यक्त न करता टाळ्यांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. निमित्त ठरले कोरोना चाचणी शिबिराचे... तेही जिल्ह्यात सुरुवातीला हॉटस्पॉट ठरलेल्या अमळनेरात.
येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूलमध्ये आज शासनाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी साठी स्वतंत्र शिबिर घेण्यात आले. याठिकाणी नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित आर्मी स्कूल, शिक्षण शास्त्र महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, कृषी तंत्र विद्यालय, औद्यागिक प्रशिक्षण संस्था यामधील 100 कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली. प्रत्येक जणाला चाचणीचा निकाल ऐकण्याची उत्सुकता होती. प्रत्येक जनाच्या मनात भीती तर होतीच. मात्र ज्या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निकाल घोषीत केला की सर्वच्या सर्व चाचण्या ह्या निगेटिव्ह आल्या आहेत त्यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. प्रत्येकाने टाळ्यांचा एकच गजर करत आनंदोत्सव साजरा केला. या शिबिरासाठी पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र शेलकर, प्रसाद शिरसागर, राहुल महाजन, प्रशांत वाणी, प्राचार्य पी. एम. कोळी व उमेश काटे यांनी सहकार्य केले.
दोन दिवसांपासून शून्य
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या शून्यावर आली आहे. ही समाधानाची बाब असली तरी दुसऱ्या संभावित कोरोना लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने सतर्क राहणे गरजेचे आहे. नागरिकांनी ही शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करून स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.
वाचा- घरकुल घोटाळा : अपात्रता प्रकरणी न्यायालयाची पाच नगरसेवकांसह आयुक्तांना नोटीस
ऑनलाइन मार्गदर्शन
कोरोना चाचणी शिबिरानंतर नवलभाऊ प्रतिष्ठानचे मानद सचिव प्रा.सुनील गरुड यांनी गुगलमीट द्वारे सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत येणाऱ्या काळात सुरू होणाऱ्या शाळांबाबत विद्यार्थी व पालकांना समुपदेशन कसे करावे या ऑनलाइन शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी डी बी पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्राचार्य पी एम कोळी यांनी प्रास्ताविक केले. बैठकीत सुरुवातीला संस्थाध्यक्ष विजय नवल पाटील यांचे व्याही निवृत्त आय पी एस अधिकारी (स्व) रामचंद्र दयाराम गावंडे यांनी आदरांजली वाहिली.