esakal | रूग्णवाहिका आली घरी सोडायला...गाव येण्यापुर्वीच केला असा प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

ambulance

सायंकाळी पॉझिटिव्ह आलेला अहवाल दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह आल्याने या रुग्णाला सोडण्यात आले होते. त्यामुळे रुग्ण घरी आणि त्याचे नातेवाईक क्वारंटाइन झाल्याचाही विचित्र प्रकार घडला आहे.

रूग्णवाहिका आली घरी सोडायला...गाव येण्यापुर्वीच केला असा प्रकार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अमळनेर : मंगरूळ (ता. अमळनेर) येथील रुग्णाला जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेने त्याच्या घरापासून पाच किलोमीटरवर सोडून रुग्णवाहिका कर्मचारी पळून गेल्याने जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला. विशेष म्हणजे सायंकाळी पॉझिटिव्ह आलेला अहवाल दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह आल्याने या रुग्णाला सोडण्यात आले होते. त्यामुळे रुग्ण घरी आणि त्याचे नातेवाईक क्वारंटाइन झाल्याचाही विचित्र प्रकार घडला आहे. 
मंगरूळ (ता. अमळनेर) येथील विजय रमेश पाटील या रुग्णाला पांढरी कावीळ आणि न्यूमोनिया असल्याने त्याला शनिवारी खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथून त्याला अमळनेर कोविड सेंटरला पाठविण्यात आले. त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. मात्र त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथेही त्याचा स्वॅब घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी रविवारी त्याचा अमळनेर येथील अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून सोमवारी त्याच्या कुटुंबातील व त्याला दवाखान्यात नेणाऱ्या व्यक्तींना अमळनेर येथे क्वारंटाइन करण्यात आले. मात्र त्याच दिवशी सायंकाळी विजय पाटील यांचा जळगाव येथे घेतलेला स्वॅब निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यासाठी रुग्णवाहिकेत बसविण्यात आले. रुग्णवाहिका सोमवारी (ता. 6) रात्री साडेअकराला अमळनेर शहराबाहेर पैलाड भागापर्यंत आल्यावर रुग्णवाहिकेतील अतितत्पर कर्मचाऱ्यांनी त्याला तेथेच उतरवून दिले. तुम्ही कशाही पद्धतीने घरी जा म्हणून सांगण्यात आले. पैलाडपासून मंगरूळ तब्बल पाच किलोमीटर दूर आहे, तेथून श्री. पाटील यांनी आपल्या मुलाला व नातेवाइकांना, मला घ्यायला या असा फोन केला. मात्र ते सर्व प्रताप महाविद्यालयात क्वारंटाइन असल्याने त्यांना तेथून हलता येत नव्हते. त्यांनी रुग्णवाहिकेच्या चालकाला फोन द्यायला सांगितले. चालकाने माणुसकी विसरून फोन घेण्यास नकार देऊन उतरवून दिले. अखेरीस मंगरूळ येथील दुसऱ्या व्यक्तीला मोटारसायकलने बोलावून विजय पाटील घरी गेले. विजय पाटील आजारी असल्याने त्यांना घरातील व्यक्तींच्या आधाराची गरज होती पण घरी ते एकटे असल्याने गोंधळले. त्यात त्यांच्या भावाची मेहुणी मृत झाल्याचा निरोप आल्याने ते अधिकच व्यथित झाले. दरम्यान, रुग्णाला रस्त्यावर सोडून जाणाऱ्या रुग्णवाहिकाचालकावर कारवाई होणे अपेक्षित आहे. रुग्ण रस्त्यातून गायब झाला असता अथवा काही झाले असते तर यास कोण जबाबदार, असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

स्वॅब तपासणीबाबत संशय 
अमळनेर तालुक्‍यातील खेडी, मंगरूळ आणि अमलेश्‍वरनगरमधील अशा तीन व्यक्तींच्या बाबतीत असे आढळून आले आहे, की त्यांचे अमळनेर येथे घेतलेले स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. दुसऱ्या दिवशी जळगावला घेतलेले अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यामुळे त्यांच्या नातेवाइकांना क्वारंटाइन व स्वॅब घेण्यासाठी गोळा करताना स्थानिक प्रशासनाला त्रास भोगावा लागला. त्यामुळे एकाच दिवसात जिल्हा रुग्णालयाच्या उपचारांनी रुग्ण निगेटिव्ह येत आहेत की प्रयोगशाळेच्या तपासणीत घोळ आहे याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

loading image