ऑनलाइन नोंदी करण्यास शिक्षकांची ना! 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण व्यवस्थित देता यावे, म्हणून १७ ऑगस्टला शालेय शिक्षण विभागाने कोरोनाच्या कामातील शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश पत्रकान्वये दिले होते. त्याची अंमलबजावणी न करता शिक्षकांना कोरोनाचे सर्वेक्षण देण्यात आले.

अमळनेर : शासनाने शिक्षकांना कोरोनाचे काम देऊ नये. त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देऊनही राष्ट्रीय कार्य म्हणून शिक्षक रोज ५० घरांचे सर्वेक्षण करण्यास तयार आहेत. मात्र, जादाचे ऑनलाइन नोंदणीचे काम देऊ नये, यांसह इतर मागण्या विविध शिक्षक संघटना व शिक्षकांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. 
शिक्षकांना ऑनलाइन शिक्षण व्यवस्थित देता यावे, म्हणून १७ ऑगस्टला शालेय शिक्षण विभागाने कोरोनाच्या कामातील शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश पत्रकान्वये दिले होते. त्याची अंमलबजावणी न करता शिक्षकांना कोरोनाचे सर्वेक्षण देण्यात आले. दिवसभर ५० घरांचे सर्वेक्षण, ऑक्सिजन, तापमान तपासणीसह त्यांचे आजार व कुटुंब, अशा २२ नोंदी कराव्या लागतात. त्यामुळे शिक्षकांना सकाळी सातपासून दुपारी तीनपर्यंत गुंतून राहावे लागते. यामुळे त्यांच्या ऑनलाइन अध्यापनावर परिणाम होत असून, ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अभियान राबविताना त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यात भरीस भर म्हणून शिक्षकांना त्या नोंदी ऑनलाइन करण्याचे काम सोपविले जाते. त्यामुळे शिक्षक शिक्षणाच्या मूळ कामापासून दूर जात आहेत. 

पन्‍नास लाखाचा विमा हवा
पालक, विद्यार्थी व संस्थाचालकांच्या रोषाला बळी पडत आहेत. कोणतेही पीपीई किट, मास्क नाही, अशा अवस्थेत शिक्षक जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. काही नागरिक दादागिरी करीत असल्याने सुरक्षेचा धोकाही आहे. यामुळे शिक्षक संघटना पदाधिकारी व शिक्षकांनी मुख्याधिकारी विद्या गायकवाड व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून ऑनलाइनचे जादा काम करण्यास नकार देऊन सुरक्षा द्यावी, ५० लाखांची विमा हमी यांसह विविध मागण्या केल्या आहेत. 
निवेदनावर नाशिक विभागीय टीडीएफ कौन्सिल सदस्य, तालुकाध्यक्ष सुशील भदाणे, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष विशाल वाघ, संजय भदाणे, रवींद्र महाजन, नरेंद्र घोरपडे, किशोर पाटील, प्रफुल्ल भदाणे, दिनेश पाटील, सरोजकुमार ठाकरे, ईश्वर गव्हाणे, प्रवीण पाटील, सुशील शिसोदे, दीपक शिंदे, प्रदीप ठाकूर, शशिकांत पाटील, महेंद्र भोई, हेमंत बाविस्कर, अविनाश पाटील, विश्वास चौधरी, प्रदीप ठाकूर, एस. एल. मनुरे, एन. जे. पाटील, पी. एच. पाटील, के. ई. सोनवणे, व्ही. डी. पाटील, ए. डी. सैंदाणे, एस. बी. मोरे, शैलेश वैद्य यांच्यासह अनेक शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner corona pired online record work teacher not intersted