esakal | तुनतुण्याची तार कोरोनाने छेडली! 
sakal

बोलून बातमी शोधा

gondhal jagran

कोविडच्या मुकाबल्यासाठी पुढे आलेल्या फिजिकल डिस्टन्स, मास्क व दोन्ही गोष्टी त्यांच्या मुळावर आल्या आहेत. वावडे परिसरात वाघ्या - मुरळीची अनेक पथके आहेत. ज्यांनी बचतीचे महत्त्व ओळखले नाही, अशा कलाकारांवर उधार- उसनवार करून चरितार्थ चालविण्याची वेळ आली आहे. 

तुनतुण्याची तार कोरोनाने छेडली! 

sakal_logo
By
किशोर पाटील

वावडे (ता. अमळनेर) : ‘वाघ्यानं संबळ खुटीला टांगलं, खंजिरी ठेवली पेटीत, शेतातलं काम होत नाही म्हणून मुरळी घरातच बसली. झिलकऱ्याच तुंतून वाजेनास झालं. ते आता दुसऱ्या कामाच्या शोधात आहेत. या महाराष्ट्राच्या लोककलेची परंपरा जतन करणाऱ्या लोककलावंतांची दैना केली. विवाह समारंभ सुरू झाले. मात्र, अद्याप जागरण, गोंधळ याला परवानगी नाही. गेल्या सात महिन्यांपासून अंधारात चाचपडत असलेले हे कलाकार उघडण्याची वाट पाहत आहेत. कोविडच्या मुकाबल्यासाठी पुढे आलेल्या फिजिकल डिस्टन्स, मास्क व दोन्ही गोष्टी त्यांच्या मुळावर आल्या आहेत. वावडे परिसरात वाघ्या - मुरळीची अनेक पथके आहेत. ज्यांनी बचतीचे महत्त्व ओळखले नाही, अशा कलाकारांवर उधार- उसनवार करून चरितार्थ चालविण्याची वेळ आली आहे. 
प्रसिद्ध वाघोबा दगडू पिंपळे म्हणाले, ‘कोविडमुळे फिजिकल डिस्टन्स, मास्कला पर्याय नाही. अशा वेळी आम्ही कला कशी सादर करणार? कोवळी असेपर्यंत काही खरे नाही. ही कला सोडून दुसरी काही करावे, तर त्याची माहिती, अनुभव नाही. कलावंतांना कष्टाची कामे कशी झेपतील? आपल्यासमोर अनेक प्रश्न आहेत; पण त्यांची उत्तरे आम्हाला सापडत नाहीत.’ 
‘वयाच्या सातव्या वर्षापासून ही कला शिकलो. वाकडी येथे जागरण गोंधळ करणाऱ्या कलाकारांसाठी संस्था स्थापन केली. आजवर असा कठीण प्रसंग कधी गुजरला नव्हता. अनेक कलाकारांच्या एक वेळच्या जेवणाची पंचाईत झाली. आमचे फार सुखाने चालले होते. आम्ही कलाकार संस्थेतर्फे वाकडी येथील खंडोबा जवळ भाविकांसाठी अन्नछत्र चालवायची. त्यांना उत्तम जेवण द्यायची. आता कोविड आला तर आपल्याच जेवणाची पंचाईत झाली. संकटात एकमेकांना मदत करीत असलो, तरी त्याला मर्यादा आहेत. संकट कधी दूर होईल, याची खात्री नाही. पिंपळे बोलत होते. 

नव्या पिढीने सन्मान द्यावा 
दगडू पिंपळे म्हणाले, जागरण, गोंधळातून आम्ही समाज प्रबोधन करतो. तरुणांची रुची वाढावी, यासाठी विनोदी किस्से व नकला सादर करतो. त्याचा चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र, बिदाशीची रक्कम वाढत नाही. राज्यातील सर्वच कलाकारांची ही खंत आहे. नव्या पिढीने या कलावंतांना सन्मान द्यावा. सुखाचे चार घास खायला मिळतील, अशी बिदागी कठीण भावनेतून द्यायला हवी. कोविडच्या संकटाने कलावंतांनी बचतीची सवय लावावी, असा धडा आम्हाला दिला जातो. 

संपादन ः राजेश सोनवणे