कोरोनाचा वेग मंदावतोय

योगेश महाजन
Saturday, 10 October 2020

'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम 15 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. शहरात आठ प्रभाग निश्चित करून 37 आरोग्य पथके नेमून विविध भागात आरोग्य तपासणी करण्यात आली.

अमळनेर (जळगाव) : 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेची पालिकेतर्फे शहरात प्रभावी अमलबजावणी झाली आहे. पहिल्या टप्प्यात 97 हजार 616 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे. या मोहिमेचे फलित म्हणजे कोरोनाचा वेग शहरात मंदावला आहे. 
'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहीम 15 सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. शहरात आठ प्रभाग निश्चित करून 37 आरोग्य पथके नेमून विविध भागात आरोग्य तपासणी करण्यात आली. पंधरा वर्षावरील सुमारे 97 हजार 616 नागिरकांची तपासणी पूर्ण झाली आहे. यात 276 संशयित रुग्ण निदर्शनात आले. 102 रुग्ण हे पॉझिटिव्ह होते. त्यांच्यावर तातडीने पुढील उपचार सुरू करण्यात आले होते. 50 वर्षावरील 19 हजार 307 जणांची तपासणी करण्यात आली. यात रक्तदाब, मधुमेह, क्षयरोग आदी आजारांचीही तपासणी करून, औषधोपचारही करण्यात आले.

अशी केली तपासणी
प्रत्येक कुटुंबाची माहिती घेताना कुटुंबप्रमुख, घरातील सदस्यांची संख्या, लहान बालके, प्रौढ, वृद्ध आदींची माहिती घेण्यात आली. घरात कुणाला ताप, सर्दी, खोकला आहे का अशी विचारणा करून, ताप, ऑक्सिजनचे प्रमाण आदी तपासणी करण्यात आली.

यांचे लाभले सहकार्य..
आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, मुख्यधिकारी डॉ. विद्या गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोसावी, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, डॉ. राजेंद्र शेलकर, प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन ही मोहीम यशस्वीरीत्या राबविली आहे. 

यांचे आहे योगदान
पर्यवेक्षिका योगिता कुककर्णी, सर्व आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालिकेचे कर्मचारी, 'एनयूएचएम'चे कर्मचारी, नगरसेवक, नियुक्त केलेले शिक्षक आदींच्या पथकाने या मोहिमेत मोठे योगदान दिले आहे. 

सोमवारपासून दुसरा टप्पा 
पहिल्या टप्प्यातील पहिली फेरी पूर्ण झाली असून शंभर टक्के काम झाले आहे. ऑनलाइनचेही सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. येत्या सोमवारपासून (ता. १२) मोहिमेचा दुसरा टप्पा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news amalner coronavirus spread speed slow this week